महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हरियाणातील विजयाचा पॅटर्न भाजपा महाराष्ट्रात राबवणार; नेमकी रणनीती काय? - HARYANA ELECTION RESULT 2024

हरियाणातील विजयाने प्रदेश भाजपामधील नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही हरियाणा पॅटर्न वापरण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने करण्यात येतोय.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2024, 2:25 PM IST

मुंबई-हरियाणा विधानसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थिती असतानाही भाजपाने बहुमतांसह विजय मिळविल्याने महाराष्ट्रातील भाजपा नेते, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालंय. हरियाणातील विजयाने प्रदेश भाजपामधील नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही हरियाणा पॅटर्न वापरण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने करण्यात येतोय. हरियाणाचा विजय हा आमच्यासाठी रोडमॅप असेल, त्यामुळे राज्यातही चांगले यश मिळेल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅटट्रिक साधलीय. गेली १० वर्षे भाजपाची हरियाणा राज्यात सत्ता होती. २०१४ मध्ये बहुमतांसह तर २०१९ मध्ये मित्रपक्षांच्या मदतीने भाजपाने हरियाणा ताब्यात ठेवले.

जातीय समीकरणाचा प्रभावी वापर :लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने हरियाणातील नेतृत्व बदल करताना मनोहरलाल खट्टर यांना बाजूला करत ओबीसी समाजातील नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रिपद दिले. खट्टर यांच्या कारभारामुळे नाराज जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला १० जागांवरून ५ जागांवर आणले होते. लोकसभेतील संमिश्र यशातून भाजपाने धडा घेत विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन आणि निवडणूक व्यवस्थापन याच्या जोरावर प्रतिकूल परिस्थिती असतानाही २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये मोठे यश मिळवलंय. या यशामागे भाजपाने साधलेले सामाजिक आणि राजकीय समीकरणाबरोबरच जातीय समीकरणे महत्त्वाची मानली जात आहेत. जाटबहुल हरियाणात भाजपाने ओबीसी, दलित यांना जवळ करत यशाच्या मार्ग शोधला. आता तसाच चमत्कार महाराष्ट्रातही करू, असे भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात काय आहे प्रयत्न? : वर्ष २०१९ ते २०२२ ही अडीच वर्ष वगळता महाराष्ट्रातही मागील दहा वर्षे भाजपा महायुतीचे सरकार आहे. २०२२ मध्ये शिवसेना आणि २०२३ मध्ये राष्ट्रवादी फुटल्यानंतर राज्यात एक वेगळीच परिस्थिती निर्माण झालीय, त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आलाय. राज्यात महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागलंय. त्याचमुळे हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपासाठी फारसे अनुकूल वातावरण नसल्याचे विविध पाहणीत आढळून आलंय. हरियाणासंदर्भातही तेच आढळून आले होते. मात्र, भाजपाने ९० पैकी ४८ जागा जिंकल्याचे समोर आलंय. आता महाराष्ट्रातही प्रतिकूल परिस्थिती नसली तरी कठोर मेहनत, सूक्ष्म नियोजन आणि निवडणूक व्यवस्थापन देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपाला दमदार यश मिळेल, असा विश्वास भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केलाय. जे हरियाणात घडले तेच महाराष्ट्रात घडेल, असे म्हणत फडणवीस यांनी कार्यकर्त्यांत ऊर्जा निर्माण केलीय. मित्रपक्षांतील नेते एकनाथ शिंदे, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी हरियाणातील विजयानंतर महाराष्ट्रातही महायुतीचेच सरकार पुन्हा येईल, असा विश्वास व्यक्त केल्याचेही ते म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रासाठी रणनीती:राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल, असे स्पष्ट संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेत. महाराष्ट्र सांभाळायला फडणवीस हे सक्षम आहेत, असा संदेश शाह यांनी नुकताच राज्यातील ५ विभागीय मेळाव्यात पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केलाय. देवेंद्र फडणवीस गेली १० वर्षे प्रदेश भाजपाचे नेतृत्व करीत आहेत. २०१४ ते २०१९ मध्ये त्यांनी राज्याचे नेतृत्व केलंय. आगामी काळात महायुतीची सत्ता आल्यास त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्व देण्याचे संकेत अमित शाह यांनी दिलेत. फडणवीस हे सर्वच अंगाने निवडणूक व्यवस्थापनातील दिग्गज मानले जातात. त्यामुळे हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपा आणि महायुती पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास भाजपामधील नेते, पदाधिकारी व्यक्त करू लागलेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यात असलेला मराठा समाज जरी काही प्रमाणात महायुतीच्या विरोधात दिसत असला तरी भाजपा आणि महायुतीने वेगळी रणनीती आखत ओबीसी समाजासह अन्य छोट्या छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय, त्यासाठी गेल्या काही महिन्यांमध्ये विविध समाजासाठी 12 महामंडळांची स्थापना करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे मराठा समाजातील काही मते विरोधात गेली तरी ओबीसी आणि अन्य जातींचे समीकरण मांडून हरियाणा पॅटर्न राबवला जातोय.

ABOUT THE AUTHOR

...view details