मुंबई South Mumbai Seat :महायुती मधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाही. केंद्रीय नेतृत्वाच्या मनधरणीनंतर अखेर सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा भाजपाला शिवसेनेने सोडली आणि किरण सामंत यांनी माघार घेतली. मात्र आता उर्वरित नाशिक, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा दक्षिण मुंबईचा मतदारसंघ आता शिवसेने ऐवजी भाजपा लढणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे आणि कल्याण पैकी एक जागा भाजपाला द्यावी यासाठी भाजपा आग्रही असताना शिवसेना शिंदे गट हे मुख्यमंत्री ठाणे मतदार संघातील असल्यामुळे ठाणे शिवसेनेकडे असायलाच हवा यावर ठाम आहेत. त्यामुळे या जागांची अदलाबदल होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
जागा वाटपात आमच्याकडे लवचिकता- उपाध्ये :भाजपा आणि शिवसेना शिंदे गट किंवा महायुतीतच जागा वाटपाबाबत अत्यंत लवचिकता आहे. कोणताही पक्ष ताणून धरत नाही. म्हणूनच किरण सामंत यांनी माघार घेतली आहे आणि नारायण राणे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे आता अन्य मतदार संघांमध्येसुद्धा सामंजस्याने आणि जिंकून येण्याच्या निकषावर आम्ही उमेदवारी देणार आहोत. त्यासाठी जागांची अदलाबदल किंवा उमेदवारांची अदलाबदल काहीही शक्य आहे. यात मात्र याबाबतीतला अंतिम निर्णय हे पक्षश्रेष्ठीच घेतील आणि तो निर्णय लवकरच होईल. ठाणे असो किंवा दक्षिण मुंबई भाजपाची कुठूनही निवडणूक लढवायची तयारी आहे, असं भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं.