मुंबई Lok Sabha Elections 2024 : भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बुधवारी (13 मार्च) 72 नावांची दुसरी यादी जाहीर केली. अशाप्रकारे आतापर्यंत भाजपानं 267 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. परंतु, एकंदरीत उमेदवारांची यादी पाहिली तर भाजपानं अनेक दिग्गजांना झटका दिला आहे. तर अनेकांना राज्यातून देशात काम करण्याची संधी दिली आहे. काही जणांची राज्यात काम करण्याची इच्छा असतानाही त्यांना केंद्रात काम करण्याची संधी देण्यात आली आहे. तर काही जण राज्यामध्ये इतरांना डोकेदुखी ठरत असताना त्यांना केंद्रात पाठवण्याची भाजपाची तयारी आहे. बघूया कसा आहे भाजपाचा गेम प्लॅन.
सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या रिंगणात: भाजपानं महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या यादीत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी दिली आहे. सुधीर मुनगंटीवार हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हते. माझं तिकीट कापलं जाव यासाठी मीच प्रयत्न करतोय, असं सांगत आपणाला खासदार होण्यात कुठलाच रस नसल्याचे संकेत त्यांनी स्पष्टपणे दिले होते. परंतु, भाजपानं त्यांना चंद्रपुरातून उमेदवारी देऊन त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवलाय. या मागचं कारण म्हणजे, 2019 च्या निवडणुकीमध्ये चंद्रपूर मधून काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर विजयी झाले होते. विशेष म्हणजे बाळू धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे विद्यमान खासदार हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. बाळू धानोरकर यांचं वर्षभरापूर्वी निधन झालं असून त्यांच्या पत्नी, वरोराच्या आमदार प्रतिमा धानोरकर यांना लोकसभेसाठी चंद्रपूर मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत या मतदारसंघात प्रभावी उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं मैदानात उतरवलंय.
राज्यसभेतील खासदार, केंद्रातील मंत्र्यांनाही दिली उमेदवारी : पंतप्रधान मोदी यांच्या इच्छेनुसार भाजपाचे राज्यसभेतील खासदार आणि केंद्रामध्ये मंत्री यांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. यासंदर्भातील सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगानं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया (गुजरात, पोरबंदर), केंद्रीय वाणिज्य आणि उद्याोग मंत्री पीयूष गोयल (महाराष्ट्र, मुंबई उत्तर), केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (मध्य प्रदेश), केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना (राजस्थान, अलवार), केंद्रीय मत्स्य उत्पादन आणि पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना गुजरात, राजकोट येथून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
तसंच केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल (आसाम), केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (ओडिशा) ,केंद्रीय पेट्रोलियम, गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी (पंजाब किंवा जम्मू काश्मीर) आणि केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र, रत्नागिरी - सिंधुदुर्ग येथून उमेदवारी दिली जाऊ शकते. यासंदर्भातील घोषणा एक-दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडेंचं पुनर्वसन : 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात होत्या. भाजपानं त्यांच्याकडं राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. परंतु, त्यानंतर देखील त्या सतत विधान परिषद, राज्यसभेत वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यात यश येत नसल्याकारणानं त्या फार नाराज होत्या. अशातच त्यांना बीडमधून त्यांच्या भगिनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात विशेषतः मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उभा ठाकला असताना ओबीसींचं एकीकरण तसंच वंजारी मतांवर डोळा ठेवत भाजपानं पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना मोकळीक : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं राज्यात ऐतिहासिक विजय मिळवला होता. तेव्हा सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, तसंच विनोद तावडे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. तर विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं. आता विनोद तावडे यांच्याकडं राष्ट्रीय सरचिटणीस पदाची महत्त्वाची जबाबदारी असून त्यांची वाटचाल केंद्रात योग्य दिशेनं सुरू आहे. तर पंकजा मुंडे यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला उमेदवारी देऊन राज्यात देवेंद्र फडवणीस यांना भाजपानं आता पूर्णतः मोकळीक दिली आहे.
नाराजी दूर करण्याचे प्रयत्न :उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी त्याचबरोबर मुंबई उत्तर पूर्व मधून विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता भाजपानं कट केला आहे. उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि मुंबई तउत्तर पूर्व मतदारसंघातून मिहीर कोटेचा यांना संधी दिली गेली आहे. या कारणानं हे दोन्ही खासदार नक्कीच नाराज आहेत. अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (13 मार्च) रात्रीच स्वतः बोरवली येथे गोपाळ शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत समजूत काढली. अशाच पद्धतीची समजूत मनोज कोटक यांची काढण्यात आली असून लवकरच त्यांचं पुनर्वसन केलं जाईल, असं आश्वासनही देण्यात आलंय.
जातीय समीकरणांची गोळाबेरीज : भाजपानं लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा करताना जातीय समीकरणांवरही बारीक लक्ष दिलं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापला असून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी शब्दात आरोप केले आहेत. अशा परिस्थितीमध्ये बहुसंख्य मराठा समाज जर एखाद्या पक्षामागे ठामपणे उभा राहिला तर विजयाचे गणित बिघडू शकते. या अनुषंगानं महाराष्ट्रात भाजपानं घोषित केलेल्या 20 उमेदवारांपैकी 9 उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत तर 5 उमेदवार ओबीसी समाजाचे आहेत. ब्राह्मण आणि अनुसूचित जातीच्या समाजाला सुद्धा प्रत्येकी एक उमेदवार दिला असून 2 अमराठी (पियुष गोयल, मिहीर कोटेचा) उमेदवारही मुंबईतून दिले गेले आहेत. त्याच प्रकारे ज्या वादग्रस्त जागा आहेत ज्यावर महायुतीमध्ये अजूनही ओढाताण सुरू आहे. अशा जागांवर भाजपानं उमेदवार घोषित केलेले नाहीत. उत्तर मध्ये मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजी नगर, हातकणंगले, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा वादग्रस्त ठिकाणी उमेदवार देण्याची घाई भाजपानं केलेली नाही.
हेही वाचा -
- Lok Sabha Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार एकाच वेळी ?; निवडणूक आयुक्तांनी दिली 'ही' माहिती
- Lok Sabha Election 2024 :पंतप्रधानांच्या नावावरच निवडणुका लढवायच्या, तर शिंदे, पवारांना जास्त जागा का द्यायच्या ; 'संघा'चा भाजपा पक्षश्रेष्ठींना सवाल ?
- लोकसभा निवडणूक 2024: भाजपाच्या 90 उमेदवारांची दुसरी यादी तयार, लवकरच होणार जाहीर ?