कोल्हापूर Chandrakant Patil : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवणार तसंच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्रुटी भरुन काढून विधानसभेत त्या पूर्ण करु, शरद पवार जसं कार्यकर्त्यांना पंप मारतात तसं आम्ही पंप मारणार नसून वस्तुस्थितीला धरुन विचारमंथन होणार आहे, त्यामुळं विधानसभा निवडणुकीत महायुती भक्कम होऊन सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंवर टीका : यावेळी चंद्रकांत पाटलांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटलं की, "माझं उद्धव ठाकरेंना प्रेमाचं विचारणं आहे की तुम्ही काय मिळवलत? तुम्ही 18 चे 9 झालात, काँग्रेस 1 ची 13 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 4 जागेचा 8 झाला. मी नेहमी लॉजिकवर बोलत असतो आणि लॉजिक असं सांगतं की उद्धव ठाकरेंची पिछेहाट झालेली आहे. परिश्रम त्यांनी खूप घेतले, लोकसभा निवडणुकीला उध्दव ठाकरेंचा चेहरा वापरला, सगळ्यांनी अंधारात ठेवलं आणि त्यांना 9 जागेवर यश मिळालं. 2019 ला त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मोहापाई किंवा काही राजकीय घटना घडल्या त्याच्यावर मात करुन पुढं जायचं असतं. मात्र, घडलेल्या या घटनांमुळं त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला त्यामुळं लोकांमध्ये ते आता कडक हिंदुत्ववादी राहिलेले नाहीत. प्रत्यक्षात त्यांचा पक्ष फुटला लोकसभेत अठराच्या जागा 9 आल्या आता विधानसभेत 30 चं जागा दिसत आहेत." तसंच आम्ही तिघेजण एकत्र येऊन राज्यात सरकार आणणार आहोत आणि या सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे असणार आहेत, असं संजय राऊत म्हणत आहेत. मात्र संजय राऊत हे कशाच्या आधारावर म्हणत आहेत असा सवाल ही चंद्रकांत पाटील यांनी विचारला.