पुणे BJP showed black flags Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान यात्रा सुरू आहे. त्यांची ही यात्र आज जुन्नरला पोहोचलीय. मात्र, अजित पवार यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. आज जुन्नरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केलीय. त्यामुळं संपूर्ण राज्यात महायुतीमधील अंतर्गत वादाची चर्चा सुरू झाली आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या चार तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघात जनसन्मान यात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी :अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. शासकीय कार्यक्रम असताना घटक पक्षांना बगल दिली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. घटक पक्षांना बाजूला सारून अजित पवार पालकत्वाची भूमिका पाळत नसल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केलीय.
कार्यक्रमस्थळी तणाव :जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असल्यानं पर्यटन वाढीशी संबंधित योजनाची आज सकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवार घटक पक्षानं मान देत नसल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या आशा बुचके यांनी केला. त्यामुळे त्यांनी यात्रेला काळे झेंडे दाखवून निषेध केला. त्यांच्यासोबत महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. त्यामुळं कार्यक्रमस्थळी तणाव निर्माण झाला होता. "सुमारे दोन तास चाललेल्या या जनसन्मान यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनाच मान दिला जातो. महायुतीतील इतर घटक पक्षांचा विचार केला जात नाही," असा आरोप बुचके यांनी केला. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.