मुंबई -विधानसभा निवडणुकीचं पडघम चांगलेच वाजू लागलंय. सत्ताधारी-विरोधक यांच्यामध्ये कलगीतुराही रंगतानादेखील पाहायला मिळेल. दरम्यान, राज्यात सरकार कोणाचे येईल यावर विविध तर्कवितर्क राजकीय तज्ज्ञ आणि विश्लेषकांकडून लावले जात असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात कोणाचे सरकार येणार याबाबत मोठं वक्तव्य केलंय.
भाजपाचा मुख्यमंत्री अन् मनसे सत्तेत असेल, राज ठाकरे आताच असं का म्हणाले?
राज्यात सरकार कोणाचे येईल यावर विविध तर्कवितर्क राजकीय विश्लेषकांकडून लावले जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात कोणाचे सरकार येणार याबाबत मोठं वक्तव्य केलंय.
Published : 4 hours ago
...तर मनसे सत्तेत असेल :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वर्तमानपत्रात दिलेल्या मुलाखतीत राज्यात कोणाचे सरकार येणार याबद्दल भाकीत केलंय. राज्यात महाविकास आघाडीसोबत जाणार नाही. शिवसेनेसोबत असताना माझा सर्वाधिक संबंध भाजपासोबत आला. भाजपाशी माझे चांगले संबंध आहे. दरम्यान, आता राज्यात सरकार महायुतीचेच येणार आहे. 3 महिन्यांपूर्वी वाटत होतं की, महाविकास आघाडीचं राज्यात सरकार येईल. मात्र हरियाणाच्या निवडणुकीनंतर चित्र बदललंय. हे असं असलं तरी महायुतीला इतकं सोपंही जाणार नाहीत. मुख्यमंत्री भाजपाचा होईल आणि मनसे सत्तेत असेल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत. महाराष्ट्रातल्या राजकीय चिखलाला शरद पवार हेच जबाबदार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय. लोकसभेत एकनाथ शिंदेंनी मनसेला धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. पण मी एकनाथ शिंदेंसारखे पक्ष किंवा चिन्ह ढापलेलं नाही. म्हणून मी शिंदेंच्या प्रस्तावाला नकार दिला. राज्यातील फोडाफोडीच राजकारण मतदारांना पटलेलं दिसत नाही आहे. फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवायला हवा," असं राज ठाकरेंनी एका वर्तमानपत्रात दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार : राज ठाकरे यांच्या या भाकितानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज ठाकरे भविष्यवाले आहेत, हे मला माहीत नाही. परंतु राज्यात जनतेला सगळं आता कळलंय. जनता सुज्ञ आहे आणि राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. याचा मला पूर्ण विश्वास आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिलीय. दुसरीकडे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री भाजपाचा होणार आणि सत्तेत मनसे सहभागी असेल, असं म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या स्टेटसवर राज ठाकरेंसोबतचा फोटो ठेवलाय. दरम्यान, फडणवीसांनी राज ठाकरे यांचा फोटो ठेवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, राज ठाकरे यांचं वक्तव्य आणि त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या स्टेटसवर राज ठाकरेंसोबतचा ठेवलेला फोटोमुळं विविध तर्कवितर्क काढले जाताहेत. आगामी काळात मनसे सत्तेत सहभागी होताना दिसणार तर नाही ना? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जाताहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यासोबतचा स्टेटसवर फोटो ठेवून एक प्रकारे सूचक संकेत दिल्याचंही बोललं जातंय. एकीकडे निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून पुढील काही दिवस तरी प्रतिक्रिया येणार यात मात्र शंका नाही.
हेही वाचा-