अमरावतीNaveen Rana :देशात पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांची हवा असल्याच्या भ्रमात भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनं राहू नये, असा सल्ला अमरावतीच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा यांनी दिला आहे. तसंच सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांना दुपारी बाराच्या आत मतदान केंद्रावर आणण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन नवनीत राणा यांनी केलं आहे. त्या आज परतवाडात भाजपाच्या आयोजित सभेत बोलत होत्या.
मोदी लाटेत मी अपक्ष निवडून आले :मागच्या निवडणुकीच्या वेळेस संपूर्ण देशभर मोदींची लाट होती. एक मोठी यंत्रणा मतदारसंघात काम करीत असतानासुद्धा मोदींच्या लाटेत मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. त्यामुळं एका अपक्ष उमेदवाराचा झेंडा अमरावती मतदासंघात गाडला गेला. म्हणून यावेळी देखील मोदींच्या लाटेच्या भरवशावर न राहता भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं बूथ स्तरावर लक्ष द्यायला हवं. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणं प्रत्येक घरातील व्यक्तीकडून दुपारी बारा वाजेपर्यंत मतदान करून घेण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांची आहे, असं देखील नवनीत राणा म्हणाल्या.