मुंबई Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती तसंच महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विधानसभा निवडणूक प्रचारात कोणते मुद्दे असतील? कोणत्या मुद्द्यांवर प्रचार करायचा? यावर देखील महायुतीकडून रणनीती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा प्रचारात वापरला जाण्याची शक्यता आहे.
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter) लोकसभेत संविधान, विधानसभेत सावरकर? : देशात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये भाजपानं 'अबकी बार 400 पार'चा नारा दिला होता. परंतु त्यांना अपेक्षापेक्षा खूपच कमी जागा देशभरात मिळाल्या. एकट्या भाजपाला 240 जागा मिळवण्यात यश आलं असून, 'एनडीए'ला पावणेतीनशे जागा मिळाल्या आहेत. निवडणूक प्रचारात इंडिया आघाडीनं तसंच महाविकास आघाडीनं लोकशाही धोक्यात असल्याचा प्रचार केला होता. तसंच त्यांनी 'संविधान बचाव मोहीम' हाती घेतली होती. भाजपाचं सरकार आल्यास संविधान बदलणार असल्याचा प्रचार विरोधकांनी केला होता. त्यामुळं भाजपाविरोधी नेरिटिव्ह तयार झाल्यानं त्यांना फटका बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळंचं महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या. आता विधानसभा निवडणुकीत भाजपानं सावध पवित्रा घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणूक प्रचारात सावरकरांचा मुद्दा उपस्थित करण्याची खेळी भाजपाकडून आखली जाण्याची शक्यता आहे, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
सावरकर हा एक विचार आहे. ज्या ठाकरेंनी सोयीनुसार मतांसाठी सावरकरांचा विचार सोडला, हिंदुत्वाचा विचार सोडला, तसं आम्ही करणार नाही. सावरकर हे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यामुळं 'सावरकर' हा प्रचाराचा मुद्दा नाही. - केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजपा
ठाकरेंची कोंडी होणार? : विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून महागाई, बेरोजगारी, कायदा, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या आदी मुद्दे प्रचारात येण्याची शक्यता आहे. हे मुद्दे महाविकास आघाडी निवडणूक प्रचारात वापरण्याची शक्यता आहे. परंतु, महायुतीकडून प्रचारात सावरकरांचा मुद्दा आणल्यास त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, सावरकरांचा राहुल गांधींनी केलेल्या अपमानाबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे? ठाकरेंना सावरकरांचा अपमान मान्य आहे का? असा प्रचार भाजपा करण्याची शक्यता आहे. त्यामुळं ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत जसा इंडिया आघाडी, महाविकास आघाडीनं संविधानाचा प्रचार केला, तसा प्रचार भाजपाकडून विधानसभा निवडणुकीत केला जाऊ शकतो.
सावरकरांना भारतरत्न द्या :भाजपा विधानसभा निवडणुकीत सावरकरांचा मुद्दा प्रचारात आणण्याची शक्यता आहे. यावर शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, "सावरकर महान व्यक्तिमत्व आहे. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. स्वातंत्र्य लढ्यातील ते शिरोमणी होते. सावरकरांचा मुद्दा प्रचाराचा किंवा रणनीतीचा भाग नसायला हवा. त्यांना आधी भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा, अशी आमची कित्येक वर्षापासून मागणी आहे."
'हे' वाचलंत का :
- "मोदी जो निर्णय घेतील..."; मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट - Uddhav Thackeray Stance
- "मुख्यमंत्री शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीला जाऊन...", वेषांतराच्या मुद्द्यावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Criticism
- अजित पवारांच्या वेशांतरावरुन तापलं राजकारण; वेशांतर करुन तब्बल दहा वेळा दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट, विरोधक आक्रमक - Ajit Pawar Disguise Controversy