मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाच्या माध्यमातून नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात चर्चेत आहेत. त्यांनी वारंवार आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर सरकारने अध्यादेश काढल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: येऊन जरांगे पाटलांकडे अध्यादेशाची प्रत दिली. त्यानंतर आपल्या मागण्या मान्य झाल्याचं म्हणत जरांगे यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. परंतु, त्यानंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं. त्यानंतर काल सरकराने विधिमंडळाचं विशेष अधिवेषण घेऊन मराठ्यांना 10 टक्के नोकरीत आरक्षण दिल्याचं जाहीर केलं. परंतु, आम्ही हे आरक्षण मागितलं नाही तर ते सग्या-सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, या आंदोलनात मोठी फूट पडल्याचं आता समोर आलंय. जरांगे यांचे सहकारी असलेले अजय महाराज बारसकर यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करत जरांगे हे वारंवार सरकारसोबत 'मॅनेज' होत असून त्यांनी मराठा समाजाची मोठी फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते आज बुधवार (दि. 21 फेब्रुवारी)रोजी पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी जरांगे यांच्याबद्दल अनेक गोष्टींची कथित पोलखोल केली आहे.
"बैठकीत एक बोलतो आणि बाहेर माध्यमांशी एक'' : गणपती पुळे, लोणावळा, वाशी अशा अनेक ठिकाणी जरांगे पाटलांनी ''गुप्त बैठका'' घेतल्या. गुप्त बैठका का घेतल्या? समाजाचा तुमच्यावर विश्वास असताना तुम्ही अशा गुप्त बैठका घेऊन समाजाची फसवणूक केली असल्याचा गंभीर आरोप बारसकर महाराजांनी यावेळी केला आहे. तसंच, जरांगे हा अज्ञानी माणूस असून त्याला अध्यादेश कळत नाही, त्याला परिपत्रक कळत नाही, त्याला कायदा कळत नाही असं म्हणत या माणसाने मराठा समाजाची फसवणूक करण्याचं थांबवावं. अन्यथा मला अनेक मोठे गौप्यस्फोट करावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. हा माणूस बैठकीत एक बोलतो आणि बाहेर माध्यमांशी एक बोलतो असं म्हणत जरांगेंनी वारंवार समाजाची फसणूकच केली असल्याचंही ते म्हणाले.
तुकाराम महाराजांचा अपमान केला: "जरांगे पाटलांना पाणी घेण्याची विनंती केली तेव्हा संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून काय सांगितलं हे त्यांना सांगत होतो. त्याचवेळी जरांगे पाटील यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द वापरत तुकाराम महाराजांचा अपमान केला. त्याचवेळी मला राग आला आणि दु:खही वाटलं. त्यानंतर मी ठरवलं यांचा खरा चेहरा समोर आणला पाहिजे. हा माणूस फक्त प्रसिद्धीच्या मागं लागला आहे. रोज पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यासारखं प्रसिद्धीच्या मागं असतो," असंही बारसकर म्हणाले. त्याचवेळी, तुकाराम महाराजांवर बोलणार असाल तर आम्ही जरांगेंच्याच नाही कुण्याच्याही विरोधात जाणार असंही ते म्हणाले.
जरांगे यांच्या सांगण्यामुळं तुमच्यावर फक्त गुन्हे : मी पैशासाठी विकला जाणारा नाही. मी कीर्तन करतो. परंतु, समाजाची फसवणूक होत असेल तर मला समाजाला जागं कराव लागेल असंही बारसकर यांनी यावेळी सांगितलं. यावेळी ते बोलताना म्हणाले, "बाबुराव वाळेकर वीस वर्षांपासून जरांगे यांच्यासोबत आहेत. परंतु, कोपर्डी प्रकरणातील हल्ला प्रकरणात काही लोकांना या जरांगे यांनी फसवलं. मात्र, त्या लोकांना शिक्षा झाली. जरांगे यांच्या सांगण्यामुळं तुमच्यावर फक्त गुन्हे दाखल होतील. त्यामुळे कुठेही रस्तारोको करू नका, आंदोलन करू नका, आणि जाळपोळ दगडफेक करून नका. कारण गु्न्हे दाखल झाल्याने आयुष्य बरबाद होईल. त्यामुळे जरांगे यांच्या नादी लागू नका, असंही बारसकर यावेळी म्हणाले. त्याचवेळी जरांगेंनी माझ्यासमोर बसून चर्चा करावी, असं आव्हानही त्यांनी दिलंय.