मुंबईDevendra Fadnavis:लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचा झालेला पराभव हा सर्वांत जास्त जर कुणाच्या जिव्हारी लागला असेल तर तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या. याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज्यात 'अबकी बार ४५ पार' हा नारा देवेंद्र फडणवीस यांनीच दिला होता. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात झालेली फोडाफोडी, इतर पक्षातून आयात केले गेलेले नेते, निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार निवडीवरून झालेला घोळ हे सर्व महायुतीच्या खासदारांची संख्या वाढवण्यासाठी झालं असलं तरी या सर्व बाबींचा उलट परिणाम दिसून आला.
विधानसभा निवडणुका फडणवीसांच्याच नेतृत्वात :या सर्व गोष्टी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हेच हिरारीने पुढे असल्या कारणाने लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी सरकारमधून त्यांना मोकळं करण्याची विनंती भाजपा पक्षश्रेष्ठींना केली होती; परंतु त्यांनी सरकारमधून बाहेर न पडता सरकारमध्येच राहून महाराष्ट्र आणि संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती राज्यातील ३५ लाख भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांना करण्यात आली होती. दिल्लीत मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र कोअर कमिटीची भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी बैठक झाल्यानंतर राज्यात कुठलेही नेतृत्व बदल केले जाणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. याचाच अर्थ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील भाजपाची धुरा ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असून त्यांच्याच नेतृत्वात राज्यातील निवडणुका लढवल्या जाणार आहेत.
शिंदे गटाचे उमेदवार त्यांना बदलावे लागले :लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी त्यांच्यात आणि महाविकास आघाडी यांच्या मतांच्या टक्केवारीत केवळ ०.३ टक्के इतकाच फरक आहे; परंतु महाविकास आघाडीचा ३१ जागांवर विजय झाला तर महायुतीला १७ जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या केंद्रस्थानी प्रमुख नेते होते. भाजपाच्याच नाही तर शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाच्या उमेदवार निवडीवर त्यांचच प्राबल्य होतं. भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचा जो अंतर्गत सर्वे केला त्या सर्वेनुसार शिंदे गटाचे उमेदवार त्यांना बदलावे लागले होते. महायुतीत जागा वाटपावरूनसुद्धा अनेक रुसवे फुगवे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत निर्णय प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांना खुली मुभा दिली होती; मात्र इतकं असूनसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची रणनीती पूर्णतः अपयशी ठरल्याचं दिसून आलं. याचा फटका भाजपा सोबत शिंदे गट आणि अजित पवार गटालाही बसला.