नाशिक Olympics 2024 : 'बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवो आणि आपणांस यशस्वी होण्यासाठी परमेश्वर आपल्या पंखात बळ देवो'. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळावं, अशी प्रार्थना करत विद्यार्थ्यांनी सर्वेश कुशारेला शुभेच्छा दिल्या.
ऑलिम्पिकमध्ये उंच उडी क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वेश कुशारेसाठी त्याचं शालेय शिक्षण झालेल्या निफाडच्या देवगाव येथील श्री. डी. आर. भोसले विद्यालयात त्याला भरघोस यश मिळण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून आमच्यासह सर्व देशवासियांचं स्वप्न पूर्ण करावं, अशी अपेक्षा विद्यार्थी, गावकरी आणि सर्वेश कुशारेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.
आज प्राथमिक फेरी : सर्वेशची ऑलिम्पिक स्पर्धेतील प्राथमिक पात्रता फेरी आज (बुधवार 7 ऑगस्ट रोजी) भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी होणार आहे. या फेरीत त्याला यश मिळावं आणि पुढील स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वेशला पाठबळ मिळावं म्हणून ही प्रार्थना करण्यात आली.
म्हणून आम्ही प्रार्थना केली :ऑलिम्पिक स्पर्धेची विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना उत्कंठा लागली असून श्री. डी. आर. भोसले विद्यालयाचा सर्वेश विद्यार्थी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. सुवर्णपदक मिळावं यासाठी शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी मिळून देवाकडे साकडं घातल्याची प्रतिक्रिया शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोचरे यांनी व्यक्त केली.