मुंबईLata Mangeshkar Music Collage : आचारसंहितेपूर्वी आज (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असताना दुसरीकडे भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय इमारतीचे ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, जे. जे. महाविद्यालयाचे संचालक राजीव मिश्रा, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, कृष्णा मंगेशकर आणि अधिकारी तसंच अन्य मंत्री उपस्थित होते.
सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल :संगीत क्षेत्रात नवे काही शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून संधी उपलब्ध होईल आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आणि मोठे भव्य-दिव्य असं संगीत महाविद्यालय देशात असावं या हेतूनं राज्य सरकारनं भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्यूझिक अँड म्युझियम स्थापन करण्यास मान्यता दिली होती. आज या संगीत महाविद्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.