महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 7:05 PM IST

Updated : Sep 26, 2024, 7:46 PM IST

ETV Bharat / state

पिठलं, भाकरी सोबत आजीच्या पुस्तकांची मेजवानी; ...येथे पोटाच्या भुकेसोबत वाचनाची भूकही भागते - Hotel Of Books

Hotel Of Books : ज्ञानेश्वरी वाचणारे असंही सांगतात की एकतरी ओवी अनुभवावी... त्याच धर्तीवर नाशिकच्या एक आजीबाई सांगतात पुस्तकाची चार तरी पानं वाचावीत. त्याला कारणही तसंच आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला पुस्तकांची गोडी लागावी, समाजात वाचन संस्कृती रुजावी यासाठी जोंधळे आजींनी ‘हॉटेल रिलॅक्स कॉर्नर’ (Hotel Relax Corner) सुरू केलय. या हॉटेलमध्ये चमचमीत जेवणासोबत पुस्तकांची मेजवानी देखील मिळते. त्याचीच ही गोष्ट...

Hotel Of Books
भिमाबाई जोंधळे यांचं 'पुस्तकाचं हॉटेल' (ETV Bharat GFX)

नाशिक Hotel Of Books : शहरातील ओझर जवळील 'आजीचं पुस्तकाचं हॉटेल'ची (Pustakanch Hotel) राज्यभर चर्चा आहे. वाचन संस्कृती वाढावी म्हणून 74 वर्षीय आजींचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. हॉटेलमधील प्रत्येक टेबलावर मेनू कार्डसोबत पुस्तक वाचनाचा आनंद येथील ग्राहकांना घेता येतो. चार पुस्तकांपासून सुरू झालेल्या या हॉटेलमध्ये आता वेगवेगळ्या विषयांची तब्बल पाच हजार पुस्तके आहेत. या हॉटेलला शालेय विद्यार्थ्यांबरोबरच राज्यभरातून वाचन प्रेमी भेट देतात.

पुस्तकाचं हॉटेल : स्वादिष्ट पिठलं भाकरी सोबत आजींच्या पुस्तकांच्या मेजवनीची सर्वत्र चर्चा आहे. नाशिकपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर 74 वर्षीय 'भिमाबाई जोंधळे' यांच 'पुस्तकाचं हॉटेल' आहे. या आगळ्यावेगळ्या हॉटेलच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढावी यासाठी त्यांनी नवीन पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. या ठिकाणी खवय्यांना पोटाची भूक भागवण्यासोबत त्यांच्या ज्ञानाची ही भूक त्या भागवतात. या हॉटेलमध्ये एक-दोन नाही तर तब्बल वेगवेगळ्या विषयाची पाच हजार पुस्तके आहेत.

प्रतिक्रिया देताना भिमाबाई जोंधळे आणि प्रवीण जोंधळे (ETV Bharat Reporter)

चहाचा व्यवसाय पोहचला हॉटेलपर्यंत: भीमाबाई यांना बालपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्यांचं पाचवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि त्यावेळच्या रुढीप्रमाणे लहान वयातच लग्न झालं. कौटुंबिक संघर्ष करत जिद्दीने त्यांनी आपल्या संसाराचा गाडा ओढला. 1972 च्या दुष्काळानंतर घराची आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळं जोंधळे आजींनी मोलमजुरी करून घराला हातभार लावला. आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं. 2010 च्या सुमारास चहाची टपरी सुरू केली. त्यावेळी त्या चहाच्या टपरीवर वर्तमानपत्र ठेवायच्या, वाचन चळवळ, संस्कृती युवा पिढीमध्ये रुजावी हा त्यांचा मुख्य उद्देश होता. काष्टातून त्यांचा चहाचा व्यवसाय हॉटेलपर्यंत पोहोचला.

मुलांशी संवाद साधताना भीमाबाई जोंधळे (ETV Bharat Reporter)

अनेक पुरस्काराने सन्मानित : आजीच्या हातच्या पिठलं भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी दूरदूरवरून खवय्ये येतात. सर्वांनी वाचावे, ज्ञानात भर पडावी या हेतूने त्यांनी हॉटेलमधील प्रत्येक टेबलवर पुस्तके ठेवण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कल्पनेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी हळूहळू पुस्तकांची संख्या वाढवत नेली. आता या हॉटेलमध्ये बसल्यानंतर आपण एखाद्या लायब्ररीमध्ये आहोत असं वाटतं. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाने काही वेळ मोबाईल बाजूला ठेऊन पुस्तकाची चार पानं तरी वाचावी असं आजी प्रत्येकाला आवर्जून सांगते.

हॉटेलमध्ये पुस्तकांचं वाचन करताना ग्राहक (ETV Bharat Reporter)


वाचकांसाठी नाविन्य संकल्पना: स्वादिष्ट जेवणासोबतच ग्राहकांना पुस्तक वाचण्यासाठी मिळत असल्यानं ग्राहकांकडून देखील दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. पेपर एजन्सीचा व्यवसाय असणाऱ्या आजीच्या मुलाने देखील आजीच्या या उपक्रमाला साथ देत त्यानं हॉटेलमध्ये नवनवीन कल्पना साकारल्या आहेत. आता या हॉटेलमध्ये पुस्तकांसोबतच नाशिक दर्शन, चित्राचे प्रदर्शन, ज्ञानाचा प्रकाश, अक्षर चित्र काव्यांनी नटलेली कवितेची भिंत, आजीची शिदोरी, पुस्तकांचे झाड, वाचन कट्टा, जुन्या वास्तुचं प्रदर्शन बघायला मिळतं.

वाचन करताना मुलं (ETV Bharat Reporter)

"आमचा मूळ व्यवसाय म्हणजे 'शेती'. मात्र, रासायनिक उद्योगामुळं जमीन नापीक झाली. यामुळं घर, शेती विकून स्थलांतर करावं लागलं. मी चहाच्या टपरीपासून सुरुवात केली. तसंच वर्तमानपत्रांची एजन्सी घेतली. मला वृत्तपत्रामुळं वाचनाची आवड निर्माण झाली. टपरीशेजारी वर्तमानपत्र वाचनासाठी स्टँड उभारला. नंतर हॉटेल सुरू केलं. अशात प्रत्येकजण हॉटेलमध्ये आल्यावर जेवण होईपर्यंत मोबाईलमध्ये गुंग असल्याचं मला जाणवलं. त्यातून पुस्तकाची कल्पना मला सुचली. मग मी प्रत्येक टेबलवर पुस्तक ठेवत ग्राहकांनी जेवण येईपर्यंत ती वाचावी असा माझा त्यांना आग्रह असतो. त्यालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. सुरूवातीला 5 पुस्तकांपासून सुरू केलेली ही वाचन चळवळ आता 5000 पुस्तकांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. अनेकांनी माझ्या संकल्पनेचं कौतुक करत मला पुस्तके भेट दिली. आता ग्राहक हॉटेलमध्ये दाखल होताच मोबाईल बाजूला ठेऊन स्वतःहून आपल्या आवडीचं पुस्तक घेऊन ते वाचण्यास सुरुवात करतात". - भिमाबाई जोंधळे, संस्थापिका, पुस्तक हॉटेल

हॉटेलमध्ये तब्बल पाच हजार पुस्तके (ETV Bharat Reporter)



25 पुस्तकांचा प्रवास 5000 पर्यंत पोहोचला: "माझी आई अल्पशिक्षित असल्यानं तरी, मोठ्या कष्टानं मला आणि बहिणीला उच्चशिक्षण दिलं. मी आज पत्रकार, साहित्यिक आणि प्रकाशक आहे. वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी आईची धडपड बघून मी आणि माझी पत्नीही त्यांना मदत करतो. या हॉटेलमध्ये एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. इथे आल्यावर ग्राहकांच्या पोटाची भूक भागवण्यासोबतच ज्ञानाची भूकही भागवली जाते. 25 पुस्तकांपासून सुरू केलेल्या हा प्रवास आज 5000 पुस्तकांपर्यंत जाऊन पोहचला आहे". ही पुस्तके प्रत्येक वयाच्या वाचकांसाठी उपलब्ध आहेत. या पुस्तकांसोबतच कवितेची भिंत, ज्ञानाचा प्रकाश, वाचन कट्टा, चित्रमय प्रदर्शन आजीची शिदोरी या सगळ्या संकल्पना आल्यावर बघायला मिळत असल्याचं प्रवीण जोंधळे यांनी सांगितलं.


हेही वाचा -

  1. वाचाल तरच वाचाल : जाणून घ्या पुस्तक आणि कॉपीराइट दिनाचं महत्व... - world book and copyright day 2024
  2. "तरुणांनी रामोजी राव यांची प्रेरणा घेऊन देशाला बलशाली करावं"; माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचं आवाहन - Venkaiah Naidu On Ramoji Rao
  3. छोट्याशा गावात लावला ज्ञानार्जनाचा दिवा! अनेकांना लागली अभ्यासाची गोडी, पाहा खास रिपोर्ट
Last Updated : Sep 26, 2024, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details