छत्रपती संभाजीनगर : भारत विकास विकलांग केंद्रातर्फे आगळावेगळा विक्रम नोंदवला जाणार आहे. एकाच वेळी 1 हजारहून अधिक विकलांग व्यक्तींना कृत्रिम अवयव देण्यासाठी नोंदणी करण्याचा हा विक्रम असणार आहे. 16 डिसेंबरला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा उपक्रम घेतला जाणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त विनायक खटावकर यांनी दिली. त्यासाठी कोट्यवधींचा निधी लागणार असून लोकसहभागातून हा उपक्रम पूर्ण होईल, असं देखील त्यांनी सांगितलं.
अद्यावत प्रणालीचे अवयव लावणार :विकलांग व्यक्तींसाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. विशेषतः दोन संस्था मोफत सुविधा पुरवतात, त्यामधे जयपूर फूट आणि भारत विकास केंद्र यांचा समावेश आहे. भारत विकास विकलांग केंद्रांतर्गत अद्यावत प्रणालीचे कृत्रिम अवयव बसवण्याचं काम केलं जात. विकलांग व्यक्तींना आधीपासून बसवण्यात येणाऱ्या जयपूर फूट पेक्षा 60% टक्के कमी वजनाचे मोड्युलर कृत्रिम अवयव तयार करण्यात येत आहेत. एका अवयवाची किंमत साधारणतः 50 हजार इतकी असते. विकलांग व्यक्तींना असे अवयव मोफत बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती भारत विकास विकलांग केंद्राचे विश्वस्त विनायक खटावकर यांनी दिली. लावण्यात येणारे अवयव नैसर्गिक अवयवांप्रमाणे काम करत असल्यानं विकलांग व्यक्तींना साधारण जीवन जगता येईल, असं त्यांनी सांगितलं.