महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nyay Sankalp Padyatra : मुंबईत काँग्रेसची 'न्याय संकल्प पदयात्रा', यात्रेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी सहभागी - Congress Nyay Sankalp Padyatra

Nyay Sankalp Padyatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी (17 मार्च) सकाळी दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी यांच्या घर मणि भवन येथून ‘न्याय संकल्प पदयात्रे’ला सुरुवात केली. या यात्रेत काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, अभिनेत्री स्वरा भास्कर आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस समर्थक सहभागी झाले होते.

Bharat Jodo Nyay Yatra Tushar Gandhi Joins Rahul Gandhi Nyay Sankalp Padyatra In Mumbai
मुंबईत काँग्रेसची न्याय संकल्प यात्रा, यात्रेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी सहभागी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 3:47 PM IST

मुंबई Nyay Sankalp Padyatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मणिपूरपासून सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा 6,700 किलोमीटरचं अंतर पार करून मुंबईत पोहोचली आहे. या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. त्यापूर्वी आज (17 मार्च) सकाळीच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महात्मा गांधी यांचे निवासस्थान असलेल्या मणी भवन येथून न्याय संकल्प पदयात्रा काढली. या पदयात्रेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे देखील काँग्रेस कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते.



गांधी संग्रहालयालाही दिली भेट : आजच्या न्याय संकल्प यात्रेची सुरुवात मणी भवन येथून सुरू करून, हा रोड शो महात्मा गांधीजींनी सन 1942 साली ज्या मैदानावरून ब्रिटिश राजवटी विरोधात भारत छोडो आंदोलनाचे रणशिंग फुंकले अशा ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत काढण्यात आला. या रोड शो मध्ये काँग्रेस नेत्यांसोबतच इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांच्या नेत्यांनी देखील सहभाग नोंदवला. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मणी भवन बाजूलाच असणाऱ्या गांधी संग्रहालयाला देखील भेट दिली. या संग्रहालयात महात्मा गांधी मुंबईत वास्तव्याला असताना त्यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांची पुस्तकं आदी गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी गांधी स्मृती स्तंभाला भेट देऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं.



शिवाजी पार्क येथे होणार सभा : आज सायंकाळी दादरच्या शिवाजी पार्क येथे या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत. सोबतच, या सभेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे देखील उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, शरद पवार आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील इंडिया आघाडीच्या उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आलीय. या सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडी लोकसभा निवणुकीच्या प्रचारांचं नारळ फोडणार आहे.

हेही वाचा -

  1. Bharat Jodo Nyay Yatra: 90 टक्के लोकसंख्या अन्यायामुळे त्रस्त-राहुल गांधी
  2. Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, म्हणाले, "अदानीच्या मागे..."
  3. Devendra Fadnavis : "काळ्या पैशाचा स्त्रोत बंद झाल्यामुळं...", देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींना सडेतोड उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details