ठाणे Rahul Gandhi On PM Narendra Modi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूरहून सुरू केलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चं आज (15 मार्च) भिवंडीत आगमन झालं. शहरातील मनपा मुख्यालयाच्या समोर असलेल्या धर्मवीर आनंद दिघे चौक येथे राहुल गांधी यांची चौकसभा होणार असल्यानं दुपारपासूनच या ठिकाणी नागरिकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सभेनंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले राहुल गांधी? : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली. पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. इलोक्टोरोल बाँड हे जगातील सर्वात मोठं हप्तावसुली रॅकेट असून सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली जात आहे. भारताच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे", असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
...हा तर राष्ट्रद्रोह :पुढं ते म्हणाले की, "एखाद्या कंपनीवर सीबीआय, ईडी किंवा आयकर विभागाची कारवाई होते. त्यानंतर ती कंपनी बाँड खरेदी करते हे उघड झालंय. काही कंपन्यांना राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, टनेलचे कंत्राट देऊन त्या कंपन्यांकडून मोठी वसुली केली जात आहे. हा गंभीर गुन्हेगारीचा प्रकार असून राष्ट्रद्रोह आहे. तसंच या घोटाळ्यात नितीन गडकरींचा सहभाग नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच हात आहे. तसंच सीबीआय, ईडी या संस्था भाजपा आणि आरएसएसच्या शस्त्र बनल्या आहेत. परंतु भाजपाची कधीतरी सत्ता जाईल आणि त्यावेळी जी कारवाई होईल ती अत्यंत कठोर असेल."