भंडारा-गोंदिया Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होत आहे. 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे तसंच 20 मे रोजी मतदान होणार आहे. पहिल्याच टप्प्यासाठी शुक्रवारी म्हणजेच 19 एप्रिलला भंडारा-गोंदिया मतदारसंघात मतदान पार पडत आहे. तसंच रामटेक, नागपूर, गडचिरोली-चिमूर तसंच चंद्रपूरच्या जागांवर मतदान होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव : भंडारा-गोंदिया मतदार संघाचा इतिहास पाहता, या मतदार संघात अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागलाय. यामध्ये पहिलं नाव म्हणेज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. आंबेडकरांचा भंडारा गोंदिया मतदार संघात पराभव झाला होता. या व्यतिरिक्त डॉ. श्रीकांत जिचकार, विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील भंडारा गोंदिया मतदार संघात पराभूत झाले होते. त्यामुळं भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाकडं देशाचं लक्ष लागलंय. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी येथे निवडणूक होत असून प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. भंडारा गोंदिया मतदारसंघात तब्बल 18 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले असून भाजपा, काँग्रेस, वंचित, बसपा, तसंच अपक्ष, बंडखोर उमेदवारांमुळं निवडणुकीत रंग आलाय.
2008 मध्ये भंडारा-गोंदिया मतदासंघ तयार : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ पहिल्यांदा 2008 मध्ये अस्तित्वात आला. पूर्वी या लोकसभा मतदारसंघाला भंडारा मतदार संघ म्हणून ओळखलं जात होतं. मात्र, त्यानंतर भंडारा जिल्ह्याचं विभाजन करून गोंदिया जिल्हा तयार करण्यात आला. त्यामुळं या मतदारसंघाला भंडारा-गोंदिया मतदासंघ असं नाव देण्यात आलं. गोंदिया जिल्हा राज्याच्या उत्तर-पूर्व भागात असून मध्य प्रदेश तसंच छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे.
मतदार संघात उद्योगधंद्याचा अभाव : जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 13लाख 22 हजार 635आहे. पुरुष तसंच महिलांची लोकसंख्या अनुक्रमे 6 लाख 62 हजार 656 आणि 6 लाख 59 हजार 964 आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्या ३ लाख ५५ हजार ४८४ तसंच 3 लाख 9 हजार 822आहे. जिल्ह्याचा साक्षरता दर 84.95% आहे. भंडारा-गोंदिया मतदार संघ जंगलानं व्यापलेला आहे. या मतदार संघात 'भात' मुख्य पीक म्हणून घेतलं जातं. तसंच ज्वारी, जवस, गहू, वाटाण्याचं देखील उत्पादन या मतदार संघात होतं. या मतदारसंघात शेती हा मुख्य व्यवसाय असल्यानं इथं उद्योगधंद्याचा अभाव आहे. त्यामुळं बेरोजगारी या मतदारसंघात प्रमुख समस्या आहे.
1999, 2004 च्या निवडणुकीत भाजपाचा विजय : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ गोंदिया, देवरी, तिरोरा तसंच मोरगाव अर्जुनी या चार उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. गोंदिया उपविभागात एक तालुका आहे. देवरी उपविभागात ३ तालुके आहेत. तिरोरा उपविभागात 2 तालुके, मोरगाव अर्जुनी उपविभागात 2 तालुके असून 556 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 1999 तसंच 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं येथून विजय मिळवला होता.