अमरावती : Beekeeping: झारखंडची राजधानी रांची येथून दोन ट्रकद्वारे एकूण 500 मधपेट्या अमरावती आल्या आहेत. येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या संत्रा बागेमध्ये या सर्व मधपेट्या सध्या ठेवण्यात आले आहेत. या मधपेट्यांमध्ये असणाऱ्या लाखो मधमाशा महाविद्यालयाच्या परिसरात असणाऱ्या संत्रे, तीळ, गहू, मका यातून या मधमाशा परागकण गोळा करणार आहे. याबाबतची माहिती मेळघाटात आदिवासी महिलांना मध गोळा करण्याचं प्रशिक्षण देणारे 'स्फूर्ती क्लस्टर'चे सुनील भालेराव यांनी' ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. या मधमाशा सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावरील विविध वृक्षांवरील परागकण गोळा करून पुन्हा आपल्या मध पेट्यांमध्ये परततात, अशी माहिती देखील सुनील भालेराव यांनी दिली आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांच्या हस्ते वितरण :मेळघाटातील आदिवासी महिलांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. मेळघाटातील आदिवासी महिला बचत गटांना एकूण 300 मधपेट्या दिल्या जाणार आहेत. तसंच, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील महिला बचत गटांना प्रत्येकी शंभर मधपेट्या वितरित केल्या जाणार आहे. शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या परिसरात 15 आणि 16 फेब्रुवारीला महिला बचत गटांचा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार हे या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. मधमाशा प्रशिक्षण घेणाऱ्या महिला बचत गटांसह कुंभार काम प्रशिक्षण तसंच खाद्यतेल प्रशिक्षण घेणाऱ्या महिला बचत गटांना देखील त्यांना उपयुक्त असणाऱ्या साहित्याचं वितरण केलं जाणार असल्याचं सुनील भालेराव यांनी सांगितलं आहे.
कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लाभ :शिवाजी कृषी महाविद्यालयात ठेवण्यात आलेल्या 500 मधपेट्यांमध्ये असणाऱ्या लाखो मधमाश्या या संत्र्यांसह विविध झाडांवरून परागकण कशा गोळा करतात याबाबतची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील मिळत आहे. ज्या भागात या मधमाशा आहेत, त्या ठिकाणी विशिष्ट काळजी घेऊन त्यांच्यामध्ये सावधपणे जाता येतं. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी देखील मधमाशी पालन हा अतिशय महत्त्वाचा आणि समृद्धी देणारा व्यवसाय असल्याचं देखील सुनील भालेराव म्हणाले आहेत.