बीड - राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांना राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कथित व्हॉट्सअप चॅट एक्स मीडियावर पोस्ट करणं भोवलं आहे. रुपाली ठोंबरे यांच्यासह सहा जणांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड पोलिसांनी नोटीस पाठविली आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणात शनिवारी (२८ डिसेंबर) सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, मोर्चापूर्वी जितेंद्र आव्हाड हे धनजंय मुंडे यांना लक्ष्य करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करत असल्याचा दावा करणारे व्हॉट्सअपचॅट रुपाली ठोंबरे यांनी एक्स मीडियात पोस्ट केले. त्यावर खोटे व्हॉट्सअप चॅट व्हायरल केल्यानं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधील शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी रुपाली ठोंबरे यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये विक्रांत फड, रेखा फड, कृष्ण धानोरकर, बिबीशन आघाव, आकाश चाटे आणि सौरभ आघाव यांचा समावेश आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पीआय खेडकर यांनी या आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
- जितेंद्र आव्हाड यांनी एक्स मीडियात पोस्ट करून म्हटले, "मी स्वतःच सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या आहे. माहितीचा वापर केला तर पोलिसांना फक्त कारवाईच करायची आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना, ' चौकशी सुरू आहे' , हे सांगण्याचे कारणच उरणार नाही".
अंजली दमानिया यांना पोलिसांची नोटीस-संतोष देशमुख प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा करणाऱ्या अंजली दमानिया यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. दाव्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे करण्यात आल्या आहेत. बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी ही नोटीस बजावली आहे. व्हॉइस मेसेज आलेला मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे द्यावे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अंजली दमानिया यांनी यापूर्वीच सर्व पुरावे जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविल्याची माहिती माध्यमांना दिली.