महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"धमक्या देणाऱ्यांना परत कॉल केले की लगेच अर्ध्या तासात..."- आमदार सुरेश धस यांचा कुणावर रोख? - MAHAVIJAY ADHIVESHAN IN SHIRDI

सौंदाना गावच्या सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी प्रशासनावर आरोप केले आहेत. ते साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

MLA Suresh Dhas
आमदार सुरेश धस (Source- ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2025, 12:50 PM IST

Updated : Jan 12, 2025, 2:03 PM IST

शिर्डी (अहिल्यानगर) - "सौंदाना गावचे सरपंच यांचा जागीच खात्मा केलाय. हा घातपात आहे की घात, याचा अजून शोध लागला नाही. परळीची चर्चा महाराष्ट्रात सुरू असताना राखेचे टिप्पर चालू आहेत. याला परळी पोलीस प्रशासन आणि थर्मल पावरचे अधिकारी जबाबदार आहेत," असा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला. ते साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलत होते. शनिवारी रात्री सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा टिप्परच्या धडकेनं मृत्यू झाल्यानंतर आमदार धस यांनी प्रतिक्रिया दिली.

भाजपाचे 'प्रदेश महाविजय अधिवेशन' आज पार पडत असताना राज्यभरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते, मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिर्डीत दाखल झाले आहेत. या अधिवेशनाला आलेल्या आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराड आणि परळीमधील अवैध व्यवसायावरून प्रशासनाला लक्ष्य केलं.

आमदार सुरेश धस यांचे गंभीर आरोप (Source- ETV Bharat Reporter)

"ऊस तोडणी हार्वेस्टिंग मशीनसाठी आठ लाख रुपयांप्रमाणे पाच हजार लोकांकडून पैसे जमा करण्यात आले. आता पहिला गुन्हा दाखल झाला. यापुढे आणखी गुन्हे दाखल होणार आहे. पैसे मागण्यांना दमबाजी करण्यात आली. आका आणि आकाचे आका हे दोघेही सहभागी असून करोडो रुपयांचा हा घोटाळा आहे," असा आमदार सुरेश धस यांनी दावा केला.

आकावरदेखील मोका लावावा-शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून भाजपावर आरोप केले आहेत. सरकार माफियांना संरक्षण देत असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली. त्यावर बोलताना आमदार धस म्हणाले," कराड यांना भाजपा संरक्षण देत नाही. त्यांना अद्याप इकडच्या गुन्ह्यात ट्रान्सफर केलेल नाही. आमची अपेक्षा की सातही लोकांवर मोक्का लावावा. त्यात आकावरदेखील मोका लावावा".

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टीला पाणी दिलं आहे. पाटोदा आणि शिरूरला लवकरात लवकर पाणी द्यावे. मतदारसंघ सुजलाम सफलम व्हावा, अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी मतदारसंघाबाबत केली आहे-सुरेश धस, आमदार

जनता हेच माझं संरक्षण-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे. त्यावर आमदार धस म्हणाले, " दमानीयांना धमकी आली असेल तर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करावी. धमकी आलेले नंबर जाहीर करावेत. कोणाला आमचं काही बरे-वाईट करायचं असेल तर ते कोणत्याही माध्यमातून करू शकतात. संतोष देशमुख यांना ते अमानवी पद्धतीनं मारू शकतात. तर ते कोणालाही मारू शकतात. मला संरक्षणाची गरज नाही. जनता हेच माझं संरक्षण आहे. आम्हाला धमक्यांचे फोन आले. आमच्या पोरांनी त्यांना परत कॉल केले की लगेच अर्ध्या तासात माफी मागतात. इतका त्यांच्यात दम असतो," असा टोलादेखील त्यांनी धमकी देणाऱ्यांना लगावला.

हेही वाचा-

  1. गुजरातचं ड्रग्ज कनेक्शन परळीत, सुरेश धस यांचा जनआक्रोश मोर्चात सनसनाटी आरोप
  2. "आकाचा आका कुणाला काय बोलला" मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आमदार सुरेश धस यांचा कुणावर रोख?
Last Updated : Jan 12, 2025, 2:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details