महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सरपंचाचा घेतला जीव, नेमका कसा घडला अपघात? - BEED ACCIDENT

भरधाव वेगानं जाणाऱ्या टिप्परनं दुचाकीला शनिवारी रात्री जोरदार धडक दिली. या अपघातात सौंदाना गावाच्या सरंपचाचा मृत्यू झाला.

Beed accident
बीड अपघात (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2025, 9:58 AM IST

Updated : Jan 12, 2025, 10:54 AM IST

बीड- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापलेलं असताना जिल्ह्यात एका सरपंचाचा अपघातात मृत्यू झाला. परळी धर्मापुरी मार्गावरील मिरवट फाट्यावर राखीची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकीला धडक दिल्यानं सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. ते सौंदाना गावचे सरपंच होते.

मिळालेल्या माहितीनुसार सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे परळीवरून शनिवारी रात्री साडेआठ वाजता काम आटपून दुचाकीनं गावाकडे निघाले होते. मिरवट येथे त्यांच्या दुचाकीला टिप्परनं धडक दिली. यावेळी अभिमन्यू क्षीरसागर हे जोराच्या धडकेनं रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सरपंच क्षीरसागर यांच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सरंपच क्षीरसागर यांचा मृतदेह परळी येथील जिल्हा रुग्णालयात शवविछेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. बीडमधील राखेचे अवैध व्यवसाय होत असल्याचे आरोप होत असताना सरपंचाचा अपघाती मृत्यू झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर यांच्या अपघाती मृत्यूबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. हा टिप्पर कोणाच्या मालकीचा आहे, याचादेखील पोलीस तपास करत आहेत.

आमदार धस यांनी पर्यावरणाचा उपस्थित केला होता प्रश्न-यापूर्वी आमदार सुरेश धस यांनी बीडमधील दहशतीचा मुद्दा मांडताना पर्यावरणाची समस्या भीषण असल्याचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते, " परळीमधील राखेसंदर्भात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र देणार आहे. कारण, पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात आहे. परळी तालुक्यात सर्वाधिक प्रदूषण होते. सिरसाळाजवळ गायरान 300 वीट भट्टी आहेत. यामधील दीडशे लोक हे माजी पालकमंत्री यांच्या घरातील लोक आहेत. ते राखेची वाहतूक करत असतात," असा खळबळजनक दावाही धस यांनी केला होता.

राख वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत-सरपंचाच्या अपघाती मृत्यूनंतर परळीमधील राख वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रापासून काही अंतरावर असलेल्या सौंदाना गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वीट उत्पादन करण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणदेखील होत आहे. गेली अनेक वर्ष या भागात वीटभट्ट्यांमधून होणारे प्रदूषण आणि औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणारी राख, त्याची वाहतूक करणारे टिप्पर यामुळे या भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील नागरिकांचे आरोग्य अनेक वेळा बिघडत असल्याचीदेखील प्राथमिक माहिती मिळत आहे.

प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी-खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यानं राखेची अवैध वाहतूक करत कोट्यावधी रुपये कमविल्याचा आमदार सुरेश धस यांनी आरोप केला होता. त्यानंतर या भागातील राख माफिया, औष्णिक वीज निर्मिती केंद्र आणि तेथील संघटित गुन्हेगारी याबाबत चर्चा सुरू झाली होती. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत सरपंचाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनानं लक्ष द्यावं, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा-

  1. संतोष देशमुख खून प्रकरण; सातही आरोपींवर मोक्का, तर विष्णू चाटेला दोन दिवसाची सीआयडी कोठडी
  2. संतोष देशमुख हत्या प्रकरण: "धनंजय मुंडे यांचं नाव डायरेक्ट...", नेमंक काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
Last Updated : Jan 12, 2025, 10:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details