पुणे :शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पक्षाकडून बारामतीत घरोघरी जात जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच काल (17 नोव्हेंबर) शरद पवार यांची पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं. याबाबत आता बारामती टेक्स्टाईल पार्कच्या वतीनं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
गेटवर असलेला सिक्युरिटी परप्रांतीय : "ज्या गेटमधून प्रतिभा पवार आतमध्ये जाण्यासाठी आल्या, त्या गेटमधून मालवाहतूक केली जाते. त्यामुळं तिथून त्यांना सोडण्यात आलं नव्हतं. टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यासाठी दुसरा गेट आहे. प्रतिभा पवार ज्या गेटमधून आल्या त्या गेटवर असलेला सिक्युरिटी हा परप्रांतीय आहे. तो त्यांना ओळखत नव्हता. मला जेव्हा कळलं, तेव्हा मी लगेच सूचना दिल्या आणि प्रतिभा पवार यांना आतमध्ये सोडण्यात आलं. आम्हाला जर याची कल्पना असती, तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिलो असतो," असं स्पष्टीकरण टेक्स्टाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांनी दिलं.