मुंबई: चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून चोरी करणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरातून पकडण्यात पोलिसांना यश आलंय. अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचा पोलिसांना संशय आहे. सुरुवातीला हा आरोपी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मुंबईत राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या रिमांड अर्जामध्ये हा आरोपी गेल्या पाच-सहा वर्षांपासून मुंबईत बेकायदा पद्धतीनं राहत असल्याचं सांगण्यात आलं. पकडण्यात आलेला आरोपी बांगलादेशी असल्याचं पोलिसांनी संशय व्यक्त केल्यानं बांगलादेशी नागरिकांविरोधातील कारवाई तीव्र करण्याची मागणी वाढीस लागली आहे.
बांगलादेशी नागरिकांनी विरोधातील कारवाई तीव्र करा : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट जवळील कावेसर या भागात जाऊन जिथून या आरोपीला अटक करण्यात आली, त्या भागाला सोमैया यांनी भेट दिली. तिथे त्यांनी काही कामगारांशी संवाद साधला. त्यापैकी बहुसंख्य कामगार बांगलादेशी असल्याचा दावा सोमैया यांनी केला. त्यांच्याकडं केवळ पश्चिम बंगालचं आधार कार्ड असून ते आधार कार्ड देखील बनावट असल्याचा संशय सोमैया यांनी व्यक्त केला. त्यामुळं पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांनी विरोधातील कारवाई तीव्र करावी अशी मागणी सोमैया यांनी केली.
आव्हाड यांच्यावर साधला निशाणा : सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणाला धार्मिक पैलू असल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. आता प्रत्यक्षात अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी असल्याचं समोर येत असल्यानं सोमैया यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. 'जितेंद्र आव्हाड जवाब दो' असं प्रत्युत्तर सोमैया यांनी आव्हाडांच्या पोस्टवर केलंय.