मुंबई -बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर जनतेचा उद्रेक समोर आला आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावर राजकारणीसुद्धा लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनीसुद्धा या घटनेनंतर गृह विभागावर टीका केली आहे. या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
Live updates
- बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीनं तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल. यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स मीडियावर पोस्ट करून दिली आहे.
- बदलापूर आंदोलन आता चिघळले आहे. पोलिसांकडून आंदोलकावर लाठीचार्ज करण्यात आला आहे.
तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल-देवेंद्र फडणवीस म्हणाले," बदलापूरची घटना ही अतिशय दुर्दैवी पद्धतीची आहे. शाळेतील दोन अतिशय लहान मुलींवर तिथे सफाई कर्मचाऱ्यानं अत्याचार केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली आहे. तत्काळ यासंदर्भात आयजी दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांची नियुक्त केली आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी, अशा प्रकारची भावना या नियुक्तीमागे आहे. तसेच या घटनेनंतर प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच हेड कॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत तातडीनं कारवाई केली जात आहे. यासंदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल. अशा प्रकारचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. फास्टट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्तावदेखील मागवण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकार आणि पोलीस विभागाचा आहे. त्या दृष्टीने अतिशय वेगानं कारवाई करायला सुरुवात झाली आहे."