महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदलापूर प्रकरणावरून राजकारण तापलं! महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला बंदची हाक - Maharashtra politics - MAHARASHTRA POLITICS

बदलापूर येथील शिक्षण संस्थेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्यात वातावरण तापलं आहे. घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूर घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

badlapur school girls case political stir
महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला बंदची हाक (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 10:34 PM IST

मुंबई-बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेचे राजकीय पडसाद उमटले आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यात २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची महाविकास आघाडीकडून हाक देण्यात आली आहे. दुसरीकडं बदलापूर प्रकरणावरून राजकारण केलं जात असल्याचा सत्ताधाऱ्यांकडून आरोप होत आहे.



सरकारला खरा रस्ता जनता दाखवेल-महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली. बैठकीला शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार वर्षा गायकवाड, मंत्री असलम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

बैठकीनंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "महाराष्ट्रात आता लहान मुली सुरक्षित नाहीत. बदलापूरच्या घटना महाराष्ट्राला काळिमा लावणारी घटना आहे. सरकारकडून घटना दाबण्याचा प्रयत्न झाला. बदलापूरमधील शिक्षण संस्था ही आरएसएस आणि भाजपाची असल्यामुळे संस्थेची बदनामी होऊ नये, म्हणून याची काळजी घेतली गेली. सत्ताधाऱ्यांना या घटनेशी काही घेणं-देणं नाही. हे सत्ताधाऱ्यांच्या बोलण्यावर स्पष्ट होत आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिली आहे. राज्यातील जनता अकार्यक्षम, असंवैधानिक आणि भ्रष्ट सरकारला खरा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करेल, यात सर्वांनी सहभागी व्हावी," असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केलं आहे.

घटनेचं राजकारण कोणी करत नाही -जयंत पाटील -मुख्यमंत्र्यांनी बदलापूर घटनेचे राजकारण केलं जात असल्याचं म्हटलं. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "बदलापूर येथील घटना राजकीय नसून याचा कोणीही राजकीय पक्ष फायदा घेत नाही. राज्यात महिलांविरोधात बालकांविरोधात अत्याचार वाढलेले आहेत. प्रकार दडपण्याचा काम झालं, या विरोधात बदलापूरकर रस्त्यावर उतरले. यात भाजपाला आणि मुख्यमंत्र्यांना राजकारण कसे दिसतं, हे आम्हाला कळत नाही." महाराष्ट्रातील जनतेसमोर सरकारला जाब विचारण्यासाठी बंद पुकारला असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

बलात्कार प्रकरणात आरोपींची चौकशी करण्याऐवजी आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. माझ्यासारख्या असंख्य लोकप्रतिनिधींना सुरक्षा देण्यात आली आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षितेची गरज नाही. माझी सुरक्षा काढून ती सुरक्षा या राज्यातील महिलांना देण्यात यावी

राज्याचे गृहमंत्री हे पार्टटाइम काम करतात-खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या वतीने पुण्यातील गुडलक चौकात निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरकारी आकडेवारीनुसार राज्यात गुन्हे वाढले आहेत. एकीकडे 200 कोटी रुपये खर्च करून सरकार जाहिरातबाजी करत आहे. आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता अतिशय गंभीर विषय झाला आहे. राज्याचे गृहमंत्री हे पार्टटाइम काम करत आहेत. राज्यात घडलेल्या घटनेबाबत ते दिल्लीतून माहिती देत होते. वकीलदेखील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. यात राजकारण आणायचं नाही, याची पारदर्शकपणे चौकशी व्हावी," अशी मागणी देखील यावेळी सुळे यांनी केली आहे.

तर आरोपीला फाशी झाली असती-केंद्र सरकारने जर शक्ती कायद्याला मंजुरी दिली असती तर बदलापूर प्रकरणातील अत्याचाराला थेट फाशी मिळाली असती, असं मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं. अनिल देशमुख म्हणाले, "शक्ती कायद्यासाठी 21 सदस्यांची समिती तयार केली होती. यात सर्वपक्षीय आमदारांचा समावेश केला होता. कायद्याच्या अभ्यासासाठी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मी स्वतः आंध्र प्रदेश राज्यात जाऊन अभ्यास केला. त्यानंतर कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला होता. तीन वर्षापूर्वी तयार केलेला कायदा कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्यानंतर दोन्ही सभागृहातदेखील मंजूर झाला." "शक्ती कायदा मंजुरीच्या प्रतीक्षेत तीन वर्षापासून केंद्रात पडला आहे. या कायद्यासाठी केंद्रात भाजपाच्या नेत्यांनी प्रयत्न करावा," अशा प्रकारची विनंती अनिल देशमुख यांनी राज्यातील भाजपा नेत्यांना केली आहे .

उज्वल निकम यांच्या नेमणूकीवर आक्षेप-विजय वडेट्टीवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ""बदलापूरमधील घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्या म्हणत बदलापूरमधील जनता रस्त्यावरून आपला आक्रोश व्यक्त करीत होती. शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित असून त्याच पक्षाच्या संबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केली जाते. लोकांनी न्यायाची काय अपेक्षा करावी. त्यामुळे उद्या प्रकरण दाबलंदेखील जाऊ शकतं. याला जबाबदार कोण?" असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर प्रकरणी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणुकीवर आक्षेप घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध-छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे पक्षानं क्रांतीचौक भागात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधक टीका करताना भर रस्त्यात टरबूज ठेऊन त्यावर बांगड्या फेकून निषेध व्यक्त केला. राज्यात एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर मंत्री लाडके भाऊ होऊ पाहत आहेत. गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात सरकार कमी पडत आहेत. त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांची हिंमत वाढत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध शिवसेना ठाकरे पक्षानं व्यक्त केला. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलीस कमी पडत आहेत. त्यांना सुरक्षा करणे शक्य नसेल तर त्यांनी बांगड्या घालाव्यात असा सल्ला ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा-

  1. बदलापूर प्रकरणावरुन काँग्रेसचा मंत्रालयावर धडक मोर्चा; राहुल गांधींनी सोशल मीडियावर व्यक्त केला संताप - Badlapur School Girl Incident
  2. "शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक, अन्यथा...", शिक्षणमंत्र्यांचे आदेश - new guidelines for school
  3. वामन म्हात्रेंना 'ते' वक्तव्य भोवलं; ॲट्रॉसिटी अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल - Vaman Mhatre

ABOUT THE AUTHOR

...view details