बदलापूरBadlapur School Case : बदलापूर शहराच्या पूर्वेकडील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. चार वर्षांच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकावर आज सकाळी सहा वाजल्यापासून आंदोलन करण्यात आलं.
मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व गाड्या आंदोलकांनी रोखल्या होत्या. आंदोलकांनी आरोपींना फाशी द्या, अशी मागणी केली. यावेळी स्थानिक आमदार किसन कथोरे, मंत्री गिरीश महाजन, माजी महापौर वामन म्हात्रे आणि पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर दहा तासांनंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करून त्यांना पांगवले.
पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज (Source - ETV Bharat Reporter) पोलिसांना कठोर निर्णय घ्यावा लागला :बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळपासून आंदोलन सुरू असल्यानं रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. सकाळपासून कर्जतच्या दिशेने मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना रेल्वेमार्गावर हटवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश आलं नाही. अखेर लाठीचार्ज करून पोलिसांना आंदोलकांना पांगवावे लागलं. यावेळी दंगल नियंत्रण पथक, आरपीएफ आणि बदलापूर पोलीस यांनी आंदोलकावर लाठीचार्ज आणि अश्रुद्रांच्या नळकांड्या यांचा वापर करत आंदोलकांना पांगवले. मात्र आंदोलकांकडूनही यावेळी दगडफेक करण्यात आली.
गिरीश महाजनांची विनंती आंदोलकांनी धुडकवली : बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी आंदोलकांना वारंवार विनंती करुनदेखील आंदोलक आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नकोय, आम्हाला लाडकी बहीण सुरक्षा योजना हवी आहे. आम्ही किती दिवस मेणबत्त्या पेटवायच्या. बलात्कारालाच जाळूया", असे फलक घेऊन आंदोलक सकाळपासून आंदोलन करत होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन रेल्वे स्थानकावर आंदोलकांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. "सरकारनं याप्रकरणी एसआयटी स्थापन केली असून, संबंधित पोलीस आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे सरकार आरोपीला कठोर शिक्षा देईल," असं आश्वासन महाजन यांनी दिलं. मात्र यावर आंदोलकांचं समाधान झालं नाही. आंदोलकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी लावून धरली.
हेही वाचा
- "फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे...", बदलापूर घटनाप्रकरणी महिला नेत्यांचा संताप - Minor Girl Sexual Assault Case
- "घटनांमध्ये होणारी वाढ पाहता जागरुक राहा,"- बदलापूर घटनेनंतर रुपाली चाकणकरांचा पालकांना सल्ला - Minor Girls Sexual Assault Case
- बदलापूरच्या शाळेची मान्यता रद्द करा, आदिती तटकरे यांची शिक्षण विभागाकडं मागणी - Badlapur School case
- बदलापूर अत्याचार प्रकरण : विरोधकांचा संताप, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी, देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल - Minor Girl Sexual Assault Case