महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदलापूर अत्याचार प्रकरण : कल्याणहून बदलापूरच्या दिशेनं लोकल सेवा सुरू, आज तगडा पोलीस बंदोबस्त तैनात - Badlapur Protest

Badlapur Protest : बदलापूर इथल्या चिमुकल्या मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे संतापलेल्या पालकांनी मोठं आंदोलन केलं. मात्र हे आंदोलन चिघळल्यानं पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे मंगळवारी रेल्वे सेवेला मोठा फटका बसला. आज मात्र बदलापूर इथं तणावपूर्ण शांतता असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Badlapur Protest
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 7:53 AM IST

मुंबई Badlapur Protest :बदलापूरमध्ये शालेय विद्यार्थिनींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात संपूर्ण बदलापूर शहरात खळबळ उडाली. 12 आणि 13 तारखेला घडलेल्या या घटनांमध्ये अद्यापही पोलिसांनी कारवाई न केल्यानं संतप्त बदलापूरकरांनी याच्या निषेधार्थ रेल्वे स्थानकाला घेराव घातला आणि रेल्वे ट्रॅक रोखला. मंगळवारी सकाळी 10 वाजता हजारो बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर उतरले. अशा स्थितीत रेल्वे ट्रॅक मोकळा करण्यासाठी पोलिसांनी 5 वाजून 50 मिनिटांनी जमावावर लाठीचार्ज केला. सकाळी दहा वाजता सुरू झालेलं आंदोलन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होतं याचा फटका मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेसेवेवर देखील झाला. तब्बल 40 हून अधिक लोकल फेऱ्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून, 15 हून अधिक मेल एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. आज सकाळी मात्र रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. तर शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मंगळवारी लोकल सेवा पूर्णपणे बंद :या संदर्भात अधिक माहिती अशी की, बदलापूर स्थानकात सुरू झालेल्या आंदोलनामुळे बदलापूर स्थानकातून सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकाच्या दिशेनं शेवटची लोकल धावली. त्यानंतर हजारो बदलापूरकर रेल्वे स्थानक परिसरात दाखल झाल्यानं आणि त्यातील काही ट्रॅकवर उतरल्यानं अंबरनाथ ते कर्जतपर्यंतची लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. साधारण सहा वाजता पोलिसांनी लाठीचार्ज करत रेल्वे स्थानक पूर्णपणे खाली केलं. त्यानंतर एक लाईट इंजिन अंबरनाथ ते वांगणी स्थानकापर्यंत चालवण्यात आलं. या इंजिनात आरपीएफचे काही जवान देखील होते. या जवानांनी रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षितते सोबतच आजूबाजूला कोणी आंदोलक नाहीत ना याची खातरजमा केली. त्यानंतर कल्याण स्थानकातून सायंकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी पहिली लोकल बदलापूरच्या दिशेनं रवाना करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली .

आंदोलनाचा रेल्वे सेवेला मोठा फटका :या काळात तब्बल 40 हून अधिक लोकल फेऱ्या अंशतः रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी दिली. अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंबरनाथ स्थानकापर्यंत चालवण्यात आल्या. या काळात उपनगरीय सेवा अंबरनाथपर्यंत होती. त्यामुळे याचा फटका वांगणी, शेलू, नेरूळ, भिवपुरी रोड आणि कर्जत या स्थानकांवर जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. या आंदोलनाचा फटका लांब पल्ल्यांच्या मेल एक्सप्रेस वाहतुकीवर देखील झाला. त्यामुळे आंदोलन काळात 15हून अधिक लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती देखील डॉक्टर स्वप्नील निला यांनी दिली आहे.

लाब पल्ल्याच्या गाड्यांना बसला फटका :मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले. त्या गाड्यांमध्ये, 22160 चेन्नई ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 22731 हैदराबाद ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, 22226 सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस, 11014 कोयबतूर ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 14805 यशवंतपूर बारमेर एक्सप्रेस, 22159 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चेन्नई एक्सप्रेस, 12263 पुणे ते हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे. या भागातील सध्याची तणावाची परिस्थिती लक्षात घेता पुढील काही दिवस बदलापूर स्थानकात आरपीएफ जवानांसह पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येणार असल्याची माहिती देखील मध्य रेल्वेचे मुख्य संपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. "2000 रुपये नको, आमच्या सुरक्षेसाठी एखादी योजना आणा", संतप्त महिलांची सरकारकडे मागणी - Badlapur School Case
  2. "घटनांमध्ये होणारी वाढ पाहता जागरुक राहा,"- बदलापूर घटनेनंतर रुपाली चाकणकरांचा पालकांना सल्ला - Minor Girls Sexual Assault Case
  3. "तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय", शिवसेना नेत्याची महिला पत्रकाराबद्दल मुक्ताफळं - Badlapur Rape Case

ABOUT THE AUTHOR

...view details