मुंबई :आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष पूर्वतयारीला लागले आहेत. सर्वच पक्षातील नेता उमेदवारीसाठी आपापल्या पक्षात मोर्चेबांधणी करत आहेत. तर काही आपल्या पक्षाला राम-राम करत सत्ताधारी पक्षाकडे वळले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी खासदार मिलींद देवरा यांनी पक्ष सोडला. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाला दुसरा धक्का आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेता बाबा सिद्दीकी आणि त्यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
देवरानंतर सिद्दीकी ? :काँग्रेसचे ज्येष्ठ नेता मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी आपला मोर्चा अजित पवार गटाकडे वळवला आहे. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेता असून वांद्रे पश्चिममधून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. राज्यात काँग्रेसचं सरकार असताना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. तसंच, त्यांनी मुंबई म्हाडाचे अध्यक्षपदही भूषवलं आहे. मात्र, 2017 पासून ते ईडीच्या रडारवर होते. कथित झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर धाड टाकत ईडीने त्यांची 462 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.
अजित पवार गटाला पाहिजे मुस्लिम चेहरा : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिवसेना भाजपासोबत सत्तेत गेले. आजित पवार गटाकडे मुंबईतील मुस्लिम चेहरा म्हणून, नवाब मलिक यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र, भाजपने नवाब मलिकांना सोबत घेण्यास विरोध दर्शवल्यामुळं अजित पवार गटाला मुंबईत मुस्लिम चेहऱ्याची गरज निर्माण झाली. त्यामुळेच सिद्दीकी यांच्या नावाला पसंती दिली जात आहे. सिद्दीकी पिता-पुत्राच्या प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी यावर उत्तर देण्याचं टाळलं. तर सध्या आपण काँग्रेसमध्येच असल्याचं बाबा सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसला दुसरा धक्का ? मुंबई शहराचे युवक काँग्रेस अध्यक्ष झिशान सिद्दीकी यांना वारंवार पक्षाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत स्थान दिलं जात नसल्याने ते नाराज असल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून ते विद्यमान आमदार आहेत. सध्या राज्यसभेच्या निवडणुका असून त्यासाठी अजित पवार गटाकडून अल्पसंख्यांक चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस नेता राहुल गांधी यांची सध्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चा समारोप 20 फेब्रुवारीला मुंबई येथे होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेसला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.