मुंबई : बाबा सिद्दीकी यांची बांद्रा येथे शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली होती. यामागं लॉरेन्स बिष्णोई गँगचा हात असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत पोलीस अधीकचा तपास करत आहेत. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली. या घटनेबाबत मुंबई पोलिसांनी महत्त्वाची माहिती शेयर केली आहे.
पुण्यात रचला कट : "बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट 3 महिन्यांपूर्वीच रचला होता. आरोपी हे बाबा सिद्दिकीच्या घरी अनेकवेळा शस्त्राशिवाय गेले होते व त्यांनी रेकीही केली होती. मुंबई क्राईम ब्रँचकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांच्या हत्येचं संपूर्ण प्लॅनिंग पुण्यात करण्यात आलं होतं. मुंबई गुन्हे शाखेनं आतापर्यंत 15 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाबही घेतले आहेत," अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
प्रशिक्षण 'युट्यूब'वरुन घेललं : "बाबा सिद्दिकींवर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. यातील गुरमेल सिंग आणि धरमराज कश्यप या दोन आरोपींनी गोळीबार कसा करायचा? बंदूक कशी चालवायची? याचं प्रशिक्षण 'युट्यूब'वरुन घेललं होतं. या आरोपींनी काही दिवस मुंबईत बंदूक चालवण्याचा सरावही केला होता. मुंबई गुन्हे शाखेनं आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली असून, तीन आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. रविवारी एका काळ्या रंगाच्या पिशवीत ७.६२ एमएमची बंदूक सापडली आहे," अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.