मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमुळे सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधक सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत. तर, दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा तपास हाती घेतला आहे. संपूर्ण राज्यभरात आणि राज्याच्या बाहेरदेखील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
शनिवारी रात्री निर्मल नगर परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर तात्काळ उपस्थितीत असलेल्या जमावानं दोन आरोपींना पकडले. मात्र, यात एक आरोपी फरार झाला आहे. ताब्यात असलेल्या दोन आरोपींची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार फरार आरोपीनं गोळ्या झाडल्याची दोन्ही आरोपींनी कबुली दिली आहे. सध्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पदके राज्याबाहेर रवाना करण्यात आली आहेत. विविध अँगलनं या हत्याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पिस्तूल देण्याकरिता डिलिव्हरी बॉयची मदत-पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, बाबा सिद्दीकीची हत्या करणारे शूटर दीड महिन्यापूर्वीच मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर या तीन शूटरनं अनेकवेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. मागील दीड महिना हे शूटर योग्य संधीच्या शोधात होते. दसऱ्याच्या दिवशी आलेल्या संधीचा फायदा घेत हल्लेखोरांनी गोळीबार केला. चौकशीदरम्यान, त्यासाठी आगाऊ रक्कमेसह कुरिअरद्वारे पिस्तूल या शूटरपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे समोर आले. यासाठी डिलिव्हरी बॉयची मदत घेण्यात आल्याची एक माहिती पोलिसांनी दिली आहे.
सलमान खानच्या घराबाहेर वाढविली सुरक्षा-याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, हरियाणातील करनल सिंह आणि उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. अभिनेता सलमान खानचे बाबा सिद्दीकी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. हे लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षादेखील वाढवली आहे. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पोलीस कुणालाही थांबू देत नाहीत.
हेही वाचा-
- घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय ते राष्ट्रवादीमधील वजनदार नेते; जाणून घ्या, बाबा सिद्दीकी यांचा राजकीय प्रवास
- बाबा सिद्दीकींच्या हत्येचे राजस्थानसह उत्तर प्रदेश कनेक्शन; दोघांना अटक, तिसरा फरार