मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (12 ऑक्टोबर) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन जणांना अटक केलीय. मात्र, यातील धर्मराज कश्यप या आरोपीनं आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यानंतर याबाबत ऑसिफिकेशन चाचणी करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. तर या चाचणीनंतर आता आरोपी धर्मराज कश्यप हा अल्पवयीन नसल्याचं समोर आलंय.
वय 17 वर्ष असल्याचा दावा : रविवारी (13 ऑक्टोबर) न्यायालयात झालेल्या युक्तीवादादरम्यान आरोपींच्या वकिलांनी आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन असल्याचं म्हटलं होतं. कश्यप हा केवळ सतरा वर्षाचा असल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर न्यायालयानं आरोपीची ऑसिफिकेशन चाचणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चाचणी केल्यानंतर आरोपी धर्मराज कश्यप हा अल्पवयीन नसून तो प्रौढ असल्याचं समोर आलं आहे. आरोपी धर्मराज कश्यप यानं आपलं वय 17 वर्ष असल्याचा दावा केला होता. परंतू, चाचणीनंतर तो प्रौढ असल्याचं समोर आल्यानं तिन्ही आरोपींना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिली.