अमरावती ZP School Students Melghat : अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जायचं तर त्यांच्याकरिता फुलांचा गुलदस्ता घेऊन जाण्याची प्रथा काही मंडळी हमखास जोपासतात. अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा (Sanjita Mohapatra) यांनी मात्र कृतीतून वेगळा आदर्श घडवून दिला. "मला भेटायला येताना फुलांचा गुलदस्ता आणण्याऐवजी जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणा" अशा विनंतीचं पत्रकच आपल्या दालनाबाहेर त्यांनी लावलं आहे. या आगळ्यावेगळ्या आणि स्तुत्य उपक्रमासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना संजीता मोहपात्रा यांनी, जिल्हा परिषदेच्या शाळेती गरीब तसेच आदिवासी विद्यार्थ्यांप्रती तळमळ व्यक्त केली.
अधिकाऱ्यांच्या दालनात पुष्पगुच्छंचा खच : अमरावतीत कुठल्याही विभागात नवे अधिकारी रुजू झाले की, काही विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट संघटना, विशिष्ट मंडळाचे प्रतिनिधी त्यांच्या स्वागत, सत्कारासाठी फुलांचा गुच्छ घेऊन जातात. विशेष म्हणजे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त या अधिकाऱयांचा स्वागत सोहळा हा तर ते रुजू झाल्यापासून सलग दोन ते तीन महिने सुरू असतो. यामुळं सुरुवातीचे दोन-चार महिने तर या अधिकाऱ्यांच्या दालनात पुष्पगुच्छांचा खच साचतो. काही खास मंडळी जेव्हा केव्हा अशा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जातात त्यावेळी हमखास पुष्पगुच्छ नेतात. अशाच स्वरूपाचा अनुभव संजीता मोहपात्रा यांना सुरुवातीच्या काळात आला. आता देखील अनेकजण कामानिमित्त भेटण्यासाठी येतात आणि सर्वात आधी मोठा पुष्पगुच्छ देतात. या पुष्पगुच्छाचं आयुष्य हे दोन ते तीन दिवस असतं. असे पुष्पगुच्छ देण्याऐवजी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एखादी वही किंवा पेन जरी आणलं तर ते अतिशय चांगलं ठरेल, असं संजीता मोहपात्रा यांनी म्हटलं.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीची अपेक्षा : अमरावती जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या 1 हजार 668 शाळांमध्ये दोन लाखाच्या आसपास विद्यार्थी आहेत. यापैकी चिखलदरा आणि धारणी या मेळघाटातील दोन तालुक्यांमध्ये सातपुडा पर्वत रांगेत अतिशय दुर्गम भागात असणाऱ्या शाळेत अनेक आदिवासी चिमुकले शिकतात. मेळघाटातील या विद्यार्थ्यांना शासनाकडून एकदा गणवेश आणि पुस्तक मिळत असलं तरी त्यांच्या गावात वही, पेन, पेन्सिल काहीही मिळत नाही. यामुळं एकदाच भेटलेली वही पूर्ण भरल्यावर त्यांना दुसरी वही मिळत नाही. अनेक गावात साधा पेन किंवा पेन्सिल देखील उपलब्ध नाही. अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना समाजाकडूनच मदतीची अपेक्षा आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीनं हवी ती सर्व मदत केली जाते. असं असलं तरी प्रत्येक वेळी काही ना काही त्रुटी राहतातच. त्यामुळं मला भेटायला येताना फुलांचा गुलदस्ता आणण्याऐवजी जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणा. - संजीता मोहपात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती