पुणेAvinash Dharmadhikari : पूजा खेडकर यांना यूपीएससीने आणखी एक दणका दिला आहे. त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसंच त्यांना यापुढे कोणत्याही सरकारी परीक्षेला बसण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. आता या प्रकरणावर माजी निवृत्त अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत यूपीएससीने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाने त्यांनी त्यांची विश्वासार्हता वाढवली आहे. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत, असं यावेळी धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे.
'हा' भ्रम दूर सारावा :अविनाश धर्माधिकारी पुढे म्हणाले की, या प्रकरणाचं युपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरसकटीकरण करू नये. युपीएससी आणि एमपीएससी मधून निवड होणारी बहुतांश मुले ही अशीच असतात, हे समजणं योग्य नाही. निवड होणारे विद्यार्थी हे खूप अभ्यास करून पुढे जात असतात. तसंच मुलांनी त्यांच्या मेहनतीवरील विश्वास कमी करू नये. अभ्यासाबरोबरच मुलांनी चरित्र देखील सुधारावं.
तरतुदींच्या गैरफायदा घेऊ नये :आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या कारवाई बाबत धर्माधिकारी म्हणाले की, यूपीएससीने पूजाच्या सर्व कागदपत्रांची छाननी करून जाहीर केलं की, तिने तरतुदींचा गैरफायदा घेतला. त्यामुळे तिची मूळची जी निवड तात्पुरती होती ती निवड रद्द केली. पुढे या प्रकारच्या कुठल्याही परीक्षांना बसायला तिला बंदी घातली आहे. हे प्रकरण म्हणजे, सगळ्यांनाच एक धडा आहे. अशा काही तरतुदींचा कोणी गैरवापर करून घेत नाहीये ना याकडं डोळ्यात तेल घालून अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. मी वाचलं की, यूपीएससीने निवेदनात म्हटलं की त्यांनी 2009 ते 2023 या काळाची त्यांनी अशी 15 हजार प्रकरणे तपासली आहेत. यात एक तरतूद तपासली गेली आहे की, अशी जी सामाजिक वर्गवारी असेल तसेच विविध प्रमाणपत्राबाबत कोणी गैरफायदा तर घेत नाही ना, याची देखील पुढील काळात दक्षता घेतली पाहिजे असं यावेळी धर्माधिकारी यांनी सांगितलं.