नागपूर Audi Hit and Run Case : 'ऑडी हिट अँड रन' प्रकरणाला आता नवं वळण लागलंय. रविवारी मध्यरात्री नागपुरात ऑडी कारनं तीन वाहनांना धडक दिली होती. ही ऑडी कार राज्यातील भाजपाच्या बड्या नेत्याच्या मुलाची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, यावर पोलिसांनी बोलण्यास नकार दिला होता. आता या प्रकरणावर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय.
प्रतिक्रिया देताना डीसीपी राहुल मदने (Etv Bharat Reporter) संकेत बावनकुळे कारमध्ये होता : अपघात झाला त्यावेळी 'ऑडी'मध्ये तीन लोकं होते. अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार व संकेत बावनकुळे हे तिघे या 'ऑडी'मध्ये बसले होते. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये होता, हे अखेर आज नागपूर पोलिसांनी मान्य केलंय. संकेत हा 'ऑडी' कार चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. संकेत हा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा आहे.
अर्जुन हावरेविरोधात गुन्हा : अपघातानंतर नागरिकांनी अर्जुन आणि रोनित या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. तर संकेत बावनकुळे हा घटनास्थळावरून निघून गेला होता. सीताबर्डी पोलिसांनी अर्जुन आणि रोनित यांची वैद्यकीय चाचणी केली असता, दोघांनीही मद्य प्राशन केलं असल्याचं समोर आलं. तर अर्जुन हा कार चालवत होता. त्यामुळं अर्जुन हावरेविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संकेत बावनकुळेची झाली चौकशी: "सुरुवातीच्या तपासात संकेत बावनकुळे हा कारमध्ये होता की नाही? या संदर्भात स्पष्टता नव्हती. मात्र, पुढील तपासात ही बाब समोर आली. संकेत बावनकुळे हा त्या कारमध्येच होता. अर्जुन आणि रोनितला ताब्यात घेऊन आम्ही जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्या माहितीवरून संकेत त्या कारमध्ये होता हे समजलं. त्यामुळं सोमवारी रात्री संकेतला बोलावून चौकशी केली," अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.
संकेत बावनकुळेनं मद्य प्राशन केलं? : तिघेही रात्री हॉटेलमधून जेवण करून येत होते, असं देखील तपासात स्पष्ट झालं. मात्र, संकेत बावनकुळे यानं देखील मद्य प्राशन केलं होतं की नाही हे स्पष्ट झालं नाही. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
आमच्यावर दबाव नाही - राहुल मदने : अपघातातील ऑडी कार ही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची होती, अशी माहिती मिळाली होती. राजकीय दबावाखाली पोलीस तपास करत असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता यावर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय. "अपघात प्रकरणाचा तपास करताना आमच्यावर कुणाचाही राजकीय दबाव नाही. अपघाताचे सीसीटीव्ही डिलीट केलx हे सत्य नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असं स्पष्टीकरण पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलं.
विरोधकांचा आरोप : "माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही," असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिलं होतं. यावर काँग्रेसनं टीका केली. "गाडी तुमच्या मुलाची असताना चालकाचे नाव आणि वाहनाविषयीची माहिती एफआयआरमध्ये का नमूद केली नाही? एफआयआर देखील तुमच्या सोयीप्रमाणे बनवून घेतला आहे का?" असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसनं सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला.
लपवाछपवी सुरू : "नागपूर येथे घडलेल्या 'ऑडी कार हिट अँड रन' प्रकरणात पोलीस व 'आरटीओ'वर कुणाचा दबाव आहे का?" असा प्रश्न शिवसेना - UBT पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. "अपघातास कारणीभूत गाडी ही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेच्या नावावर आहे, असं स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणात लपवाछपवी सुरू आहे," असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
हेही वाचा -भाजपाच्या राज्यातील बड्या नेत्याच्या लेकाचा 'कार'नामा; 'ऑडी'नं अनेक गाड्यांना उडवलं, वडील म्हणतात...