पुणेPune Crime :शहरातील भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार 15 ऑगस्ट रोजी घडला. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिकते. आरोपी तरुण त्याच शाळेचा विद्यार्थी आहे. या प्रकरणी १९ वर्षीय आरोपी तरुणाविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. अनेकदा नापास झाल्यानं तो शाळेत असूनही कायद्यानं अल्पवयीन नाही. याप्रकरणी पीडित मुलीच्या 30 वर्षीय आईनं फिर्याद दिली आहे.
मुलीच्या आईनं दिली तक्रार : याबाबत समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भवानी पेठ परिसरात नामांकित शाळा आहे. इथं 15 ऑगस्टच्या दिवशी पीडित मुलगी शाळेतील दुसऱ्या मजल्यावर आपली स्कूल बॅग शोधण्यासाठी जात होती. तेव्हा आरोपी दुसऱ्या मजल्यावरील मुलांच्या स्वच्छतागृहाजवळच थांबला होता. पीडित मुलगी जवळ येताच आरोपीनं तिचा हात पकडत तिला जबरदस्तीनं स्वच्छतागृहात ओढलं. यावेळी आरोपी तरुणानं तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य केलं. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीनं आपली सुटका करत तरुणाच्या तावडीतून पळ काढला. पीडित तरुणीनं घरी गेल्यावर आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईनं पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. यानुसार आरोपी तरुणाच्या विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत".