किरण पावसकर ठाकरे गटावर आरोप करताना (Reporter) मुंबईKiran Pavaskar Allegates : महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान उद्या पार पडत आहे. या निवडणुकीत आणि मुंबईतील सहाही जागा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तसेच विविध माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. दरम्यान, मतांसाठी ठाकरे गटाकडून अल्पसंख्यांक समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गटाचे) नेते किरण पावसकर यांनी केला आहे. आज किरण पावसकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबईत 37 धार्मिक स्थळांमध्ये फतवा :पुढं बोलताना किरण पावसकर म्हणाले की, मुंबईतील 37 धार्मिक स्थळांमधून फतवे काढले जाताहेत की, तुमची जी धार्मिक स्थळ आहेत त्यांची तोडफोड होणार आहे आणि तुमचे धार्मिक अस्तित्व नष्ट होणार आहे. यासाठी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतं देऊ नका. तर तुमचे धार्मिक स्थळं सुरक्षित राहण्यासाठी 'इंडिया' आघाडी आणि महाविकास आघाडीला मतदान करा. मुंबईतील 37 धार्मिक स्थळांमधून फतवे काढल्याची माहिती समोर आली आहे, असं किरण पावसकर यांनी सांगितलं. त्यामुळं असे फतवे काढून उबाठा गटाकडून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण केले जात आहेत, असा आरोप किरण पावसकर यांनी ठाकरे गटावर केला.
पोस्टर्सच्या माध्यमातून तेढ निर्माण: "ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे मागील कित्येक दिवसांपासून म्हणत होते की, निवडणुकीपूर्वी दंगली होतील. भाजपाकडून देशात दंगली घडवल्या जातील, मात्र आता त्यांच्याकडूनच अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांबाहेर मोठमोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्या पोस्टरच्या माध्यमातून अल्पसंख्यांकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या पोस्टरवर अल्पसंख्यांक धोक्यात असून, त्यांच्या धार्मिक स्थळांची नासधूस केली जाणार आहे, असं म्हटलं आहे. हे पोस्टर ठाकरे गटाकडून लावण्यात आले आहेत, अशी आमची शंका आहे. पण हे पोस्टर्स कोणी लावले याची चौकशी होऊन पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असे पावसकर म्हणाले. जे निवडणुकीपूर्वी दंगली होतील, म्हणत होते त्यांनीच आता हे पोस्टर्स लावले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे," असं पावसकर म्हणाले.
हेही वाचा:
- निवडणुकीच्या निकालावर चक्क बुलेटची लावली पैज, 'तो' कागद सोशल मीडियावर व्हायरल, दोन मित्रांवर गुन्हा - Gambling On Election Result
- "अजित पवारांमध्ये कोणते गुण कमी होते?"; शरद पवारांच्या 'त्या' दाव्यानंतर अमोल मिटकरींचा सवाल - Lok Sabha Election
- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी होणार मतदान, महाराष्ट्रातील 'या' नेत्यांमध्ये होणार 'टाईट-फाईट' - Lok Sabha Elections 5th Phase