खळबळजनक! व्याजाचे पैसे उशिरा परत दिल्याच्या वादातून भररस्त्यात व्यावसायिकावर तलवारीने हल्ला; थरार सीसीटीव्हीत कैद - MONEY ON INTEREST
हल्लेखोराच्या विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर आरोपी फरार झालाय
Published : Nov 13, 2024, 12:40 PM IST
|Updated : Nov 13, 2024, 12:47 PM IST
ठाणे:एका महिलेच्या पतीनं व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना भिवंडीत उघडकीस आलीय. व्यावसायिकाने शेजारील महिलेकडून व्याजावर पैसे घेतले होते, परंतु ते पैसे फेडण्यास व्यावसायिकास थोडा उशीर झाला. पैसे उशिरा परत केल्याच्या रागातून त्या महिलेच्या पतीने व्यावसायिकावर तलवारीने वार करीत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. खरं तर ही घटना भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील भर रस्त्यात घडलीय. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. याप्रकरणी हल्लेखोराच्या विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर आरोपी फरार झालाय. दर्पण मंगलदास पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोराचे नाव असून, तर प्रेमनाथ अंतुराम मढवी (42) हा व्यावसायिक हल्ल्यात जखमी झालाय.
प्रेमनाथने मनीषाकडून घेतलेले पैसे केले परत : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जखमी प्रेमनाथ मढवी यांचा खडी, क्रशर, दगड वितरण करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी शेजारील हल्लेखोर दर्पण याची पत्नी मनीषा हिच्याकडून दीड वर्षांपूर्वी व्याजाने 15 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर 1 वर्षापूर्वी प्रेमनाथने व्याजाने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दर्पणने प्रेमनाथशी भांडण केले होते. त्यामुळे प्रेमनाथने मनीषाकडून घेतलेले पैसे परत केले. मात्र तरीही आरोपी दर्पणने प्रेमनाथ घरी नसताना त्यास कोयता घेऊन जात जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर याच रागातून 8 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास प्रेमनाथ खारबाव नाक्यावर मच्छी आणायला रस्त्याने जात असता आरोपी दर्पणने पाठीमागून येऊन प्रेमनाथवर तलवारीने सपासप वार करून त्यास ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले.
फरार आरोपीचा शोध सुरू : दरम्यान, प्रेमनाथवर भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी दर्पणच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 109, 352 सह सशस्त्र अधिनियम 4, 25 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दिलीय. तसेच फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलं असून, लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले. मात्र भर दिवसा रस्त्यात घडलेल्या या हल्ल्लाच्या थरारामुळं परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय.
हेही वाचा-