नंदुरबार : धडगाव तालुक्यातील सातपुड्यातील सर्वोच्च शिखरावर अश्वत्थामा ऋषी यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून डोक्यावर कळस घेऊन आणि विविध प्रकारच्या वेशभूषा साकारत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत आदिवासी बांधव अश्वत्थामा ज्याला स्थानिक लोक अस्तंबा ऋषी म्हणतात त्यांच्या दर्शनासाठी गुजरात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील जवळच्या भागातून भाविक येत असतात. शेतकरी आपल्या शेतात पिकवलेलं नवं धान्य अस्तंबा ऋषीला नैवेद्य दाखवल्यानंतर धान्याच्या कापणीला आदिवासी बांधव सुरुवात करत असतात. या यात्रोत्सवाला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील हजारो तरुण पदयात्रा करत अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी शिखरावर रवाना होत असतात. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचं भाविकांना मोठं आकर्षण असतं. यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. समुद्री सपाटीपासून सुमारे 4 हजार फूट उंच शिखरावर अस्तंबा ऋषींचं देवस्थान आहे. भाविकांची अपारश्रद्धा असल्यानं हाती भगवा झेंडा घेत अस्तंबा ऋषींचा जय जयकार करत भाविक पदयात्रेला सुरुवात करत असतात. यंदा उंच शिखरावरून पाय घसरून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत धडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अस्तंबा ऋषींच्या यात्रोत्सवाला तीन राज्यातील भाविकांची हजेरी -सातपुड्यातील उंच शिखरात वसलेल्या अस्तंबा ऋषींच्या धनत्रयोदशीपासून यात्रेला प्रारंभ होत असतो. गुजरात मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील हजारो भाविक विशेषतः युवक यात्रा उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. अरुंद रस्ता, खोलदरीतून वाट काढत भाविक उंच शिखरावर अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी येत असतात.