मुंबई BJP Vs Shivsena War : ''आमच्यामुळं तुमचा पक्ष वाढला, आमच्यामुळं तुमची सत्ता आली आणि आमच्यामुळंच तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र दिसला'', अशी टीका शिवसेनेकडून (ठाकरे गट) भाजपावर केली जात आहे. शिवसेना नसती तर महाराष्ट्रात भाजपाला कोणीही ओळखलं नसतं. म्हणून आमच्यामुळं (शिवसेना) भाजपाला मुंबई, महाराष्ट्र दिसला असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर भाजपाकडूनही 'जशाच तसं' उत्तर मिळालं आहे. ''आमच्यामुळं तुम्हाला दिल्ली दिसली'', असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलंय. त्यामुळं राज्यात 'आमची-तुमची'चं राजकारण वाढत आहे.
भाजपाला आमच्यामुळं मुंबई-महाराष्ट्र दिसला :राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर खासदार संजय राऊत हे खूपच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. ते सत्ताधाऱ्यांवर दररोज टीका करताहेत. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्योराप होत असताना संजय राऊत यांनी एका वेगळ्याच कारणावरून भाजपाला लक्ष्य केलंय. ''शिवसेना नसती तर भाजपाला महाराष्ट्र दिसलाच नसता. महाराष्ट्रात भाजपा वाढण्यास आणि मोठी होण्यास शिवसेनेचा मोठा हात आहे. तसंच शिवसेनेमुळं मुंबईत आणि महाराष्ट्रात भाजपानं हातपाय पसरले. त्यामुळं भाजपानं जास्त फडफड करू नये'', अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केलीय.
तुम्हाला दिल्ली आमच्यामुळं दिसली :दुसरीकडे संजय राऊतांच्या वक्तव्याचा आशिष शेलारांनी खरपूस समाचार घेतला आहे. ''दररोज सकाळी त्यांचा (संजय राऊतांचा) भोंगा वाजत असतो; परंतु त्यांना कोणी आता गांभीर्यानं घेत नाही. संजय राऊत म्हणतात की, मुंबई आणि महाराष्ट्र भाजपाला हा शिवसेनेमुळं दिसला. पण, ते अज्ञानी आहेत. जेव्हा मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता नव्हती त्यावेळी तिथं भाजपाचा नगरसेवक होता. जेव्हा शिवसेनेनं विधानसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांच्याकडे निवडणूक चिन्ह नव्हतं. त्यावेळी शिवसेनेच्या एका आमदारानं भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती; परंतु हे संजय राऊतांचा अभ्यास कमी असल्यामुळं त्यांना माहीत नाही. तसेच शिवसेना वाढवण्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा हात मोठा आहे; पण या बांडगुळांना भाजपामुळं दिल्ली दिसली'', असा प्रतिहल्ला आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर केला.