छत्रपती संभाजीनगर Ashadhi Wari 2024: हरिनामाचा जय घोष करत संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली. शुक्रवारी सायंकाळी पैठण इथल्या नाथ मंदिरातून वाजतगाजत पालखी गावाच्या बाहेर निघाली. मुख्य मानाची असलेली पालखी जवळपास १९ दिवस प्रवास करुन पंढरपूरला पोहोचणार. मोठ्या भक्तिमय वातावरणात वारकरी लाडक्या विठुरायाचं नामस्मरण करत प्रवास पूर्ण करतात. रोज २५ ते ३० किलोमीटर रोजचा प्रवास केला जातो. या वर्षी सोहळ्याचं हे ४२५ वर्ष आहे.
जुन्या वाड्यातून सुरू झाला सोहळा: संत एकनाथ महाराजांच्या पारंपरिक वाड्यातून पालखी दुपारी दोनच्या सुमारास मंदिराकडं निघाली. एकनाथांच्या गजरात महाराजांच्या पादुका नाथ मंदिरात नेण्यात आल्या. तीन तास पादुका वारकऱ्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी ओटा इथं आणण्यात आली. तिथं मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं. गावातील नागरिकांनी पादुकांचं दर्शन घेतलं. वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी लेझिम खेळून पांडुरंगाचं नामस्मरण केलं. यंदा चांगला पाऊस पडू दे, दुष्काळाचं सावट हटू दे, अशी मनोकामना शेतकऱ्यांनी एकनाथ महाराजांच्या चरणी केली.
नाथ महाराजांच्या घरी पांडुरंगानं भरलं होतं पाणी:नाथ महाराजांकडं पांडुरंग स्वतः श्रीखंड्याच्या रुपात काम करत होते. त्यावेळी नाथांच्या घरी पांडुरंगानं स्वतः पाणी भरलं होतं, अशी आख्यायिका आहे. तितकंच नाही, तर एकनाथ महाराजांनी ज्यावेळी गोदावरी नदीच्या तीरावर समाधी घेतली, त्यावेळी गोदा नाथांच्या चरणी नेहमी असेल, असं मानलं गेलं. आजही नाथ मंदिरात महाराजांच्या पादुकांच्या चरणी पाणी आढळून येते. कितीही दुष्काळ असला, नदी पात्रात पाणी नसलं, तरी महाराजांच्या पादुकाच्या खाली पाणी लागते. त्यामुळे भाविकांचं मोठं श्रद्धास्थान म्हणून नाथ मंदिराची ओळख आहे. नाथ महाराजांच्या पादुका पंढरपूरकडं प्रस्थान होताना एक आगळावेगळा सोहळा यावेळी साजरा केला जातो.
पाच वेळा होईल रिंगण सोहळा: या पालखी सोहळ्याचं पारंपरिक प्रथम रिंगण १ जुलै रोजी श्रीसंत 'भगवान बाबा गडाच्या पायथ्याशी असलेल्या मिडसांगवी या ठिकाणी होणार आहे. दूसरं रिंगण ५ जुलै रोजी पारगाव घुमरे, तिसरं रिंगण ८ जुलै रोजी नांगरडोह, ११ जुलै रोजी चौथं रिंगण कव्हेदंड, पाचवं रिंगण १६ जुलै रोजी पार पडणार आहे.
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना: पाऊस पडू दे, दुष्काळाचं सावट हटू दे, शेतकऱ्यांची मनोकामना - Ashadhi Wari 2024 - ASHADHI WARI 2024
Ashadhi Wari 2024 संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं शुक्रवारी पैठण येथून रवाना झाली. ही पालखी १९ दिवस प्रवास करुन पंढरपूरला पोहोचणार आहे. रोज २५ ते ३० किलोमीटर पायी प्रवास केला जाईल. हरिनामाचा जयघोष करत वारकरी रवाना झाले आहेत.
संत एकनाथ महाराज पालखी (ETV Bharat)
Published : Jun 29, 2024, 8:25 AM IST