पंढरपूर (सोलापूर) :पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याहस्ते शासकीय महापूजा करून संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. आज वाखरी येथे गोल रिंगण संपल्यानंतर सर्व पालख्या पंढरपूरकडं प्रस्थान झाल्या. तर पंढरपूरमध्ये भक्तांचा महापूर लोटला आहे.
पंढरपुरात 15 लाख भाविक दाखल : आषाढी एकादशी सोहळ्यासाठी तब्बल 15 लाख भाविक दाखल होण्याचा अंदाज प्रशासनाच्या वतीनं वर्तण्यात आला. यावर्षी वारीमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. कारण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वदूर मान्सूनचा चांगला पाऊस झाल्यानं, अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळं पेरण्या झालेले शेतकरी या वारीमध्ये सहभागी झालेले दिसून येत आहेत. चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी देखील समाधानी आणि आनंदी आहे.
भाविकांना सोयी सुविधा : भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केलीय. मंदिरे समितीनं यावर्षी दोन पत्रा शेड वाढवले आहेत. गोपाळपूर नजीक पदस्पर्श दर्शनची रांग पोचली आहे. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना तब्बल 18 ते 20 तास लागत आहेत. पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीनं शुद्ध पिण्याचे पाणी, चहा, तसेच विश्रांती कक्षाची सोय केलीय. वारीमध्ये स्वच्छतेवरती अधिक भर देण्यात आला आहे. पंढरपूर नगरपालिका, आरोग्य विभाग, मंदिर समिती यांच्यावतीनं अधिक कर्मचारी नेमून भाविकांना सोयी सुविधा देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे दोन दिवस पंढरपूरात : आषाढी एकादशी निमित्ताने 65 एकर परिसर, चंद्रभागा वाळवंट, विप्रदत्त घाट, गोपाळपूर येथील दर्शन रांग गर्दीने फुलून गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस पंढरपूरात मुक्कामी आहेत. या दोन दिवसांमध्ये अनेक प्रशासकीय कामाचे उद्घाटन होणार आहे. आषाढी एकादशीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा -
- आषाढी एकादशी 2024; मानाच्या पालख्या वाखरीत दाखल, 12 लाख भाविक मुक्कामी - Ashadhi Ekadashi 2024
- आषाढी एकादशी 2024 : 'या' पद्धतीनं विठ्ठलाची करा पूजा; जाणून घ्या विधी आणि महत्व - Ashadhi Ekadashi 2024