कोल्हापूर Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज देशभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. टाळ, मृदंग आणि विठू माऊलीच्या गजरात उभी पंढरी न्हाऊन निघते. अशाच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "नंदवाळ" या गावी देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाय पुईखडी येथे वाखरीप्रमाणे गोल रिंगण सोहळा सुद्धा पार पडला. सकाळपासून लाखोंच्या संख्येने भाविक नंदवाळ येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते.
असा रंगला रिंगण सोहळा : "नंदवाळ" येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरते. कोल्हापूर येथून प्रतिवर्षी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जात असते. या दिंडीत शंभरहून अधिक गावातील दिंड्या सहभागी होतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. आज सकाळी मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरातून शिवाजी पेठ मार्गे ही दिंडी सानेगुरुजी, वाशी नाका मार्गे प्रतिपंढरपूर नंदवाळकडे रवाना झाली. यावेळी पहिला उभा रिंगण सोहळा खंडोबा तालिम येथे तर पुईखडी याठिकाणी असलेल्या मैदानात गोल रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात झाला.
भर पावसात विठू माऊलीचा गजर: यंदा या सोहळ्यात आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाप्रमाणे येथे देखील लाकडी रथ तयार करण्यात आला होता. तसंच ज्ञानेश्वर महाराजांची चांदीची पालखी देखील आणण्यात आली होती. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार ऋतुराज पाटील, राजेश पाटील यांच्याहस्ते पूजा करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी कोल्हापूरसह जिल्ह्यातील हजारो भाविक भर पावसात उपस्थित होते. यावेळी सर्वत्र विठू माऊलीचा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर ऐकू येत होता. भर पावसात छत्र्यांसोबत भगवी पताका देखील प्रत्येकाच्या हातात दिसत होती. लहान असो किंवा ज्येष्ठ प्रत्येक प्रत्येकजण भर पावसात विठू माऊलीच्या भक्तीमध्ये भिजून गेला होता. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर रिंगण पालखी पुढे मार्गस्थ होऊन "नंदवाळ" या गावी असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी रवाना झाली. नंदवाळ येथे पालखी भक्तांच्या दर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आली.