छत्रपती संभाजीनगर Bharat Mata Temple : देशात एकमेव असलेल्या मंदिरात आता भारत मातेची पूजा करता येणार नाही. भारतीय पुरातत्व विभागानं काढलेल्या परिपत्रकानुसार, यापुढं तिथं असलेले सर्व पूजा विधी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळं स्थानिकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. भारत स्वतंत्र झाला त्या काळापासून दरवर्षी विशेष सोहळा त्या ठिकाणी साजरा केला जातो. त्याचबरोबर स्थानिक नेमून दिलेले पूजारी रोज विधिवत भारत मातेचं पूजन देखील करतात. मात्र, आता हे विधी बंद करण्याचे निर्देश दिल्यावर मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला जातोय.
पुरातत्व विभागानं काढलं परिपत्रक : देशात भारतमातेचं मंदिर अतिशय दुर्मिळच पाहायला मिळतं. ऐतिहासिक असलेल्या दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर भारत मातेचं मंदिर देखील तितकंच प्रसिद्ध आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून या मंदिरात भारत मातेचं देवासारखं पूजन केलं जातं. मात्र, अचानक पुरातत्व विभागानं या ठिकाणी पूजन बंद करण्याचे निर्देश जारी केले आहे. यापुढं तिथं कार्यरत असलेले पुजारी राजू कांजूने यांना पूजा करु देऊ नये, अथवा त्यांना त्या भागात प्रवेश देऊ नये. ऐतिहासिक वास्तु मधे प्रवेश निषिद्ध असलेली ही वास्तु असल्यानं प्रतिबंध घालण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच या आदेशाचं उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळं या आदेशामुळं देशभक्त बांधवांनी संताप व्यक्त केला आहे.