मुंबई Drugs Seized In Mumbai : ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या सात जणांच्या एका गॅंगला मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केलीय. या आरोपींकडून पोलिसांनी सव्वाकोटीचं हेरॉईन आणि बारा लाखांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घुगे यांनी दिलीय. या सात आरोपींविरुद्ध विरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून याच गुन्ह्यांत त्यांना किल्ला कोर्टानं पोलीस कोठडी सुनावलीय.
सात जणांना घेतलं ताब्यात : मालाड आणि वसई इथं काहीजण हेरॉईन या ड्रग्जच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथं साध्या वेशात पाळत ठेवली. या दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 310 ग्रॅम वजनाचं उच्च प्रतीचं हेरॉईन सापडलं. त्याची किंमत सुमारे सव्वाकोटी रुपये आहे. ही कारवाई सुरु असतानाच वरळी युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी कुर्ला इथून तीन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडून पोलिसांनी बारा लाखांचे 60 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
आरोपींची तपासणी सुरु : "या सातही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. याच गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं त्यांना पोलीस कोठडी सुनावलीय. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांना ते ड्रग्ज कोणी दिलं, कोणाला विक्रीसाठी ड्रग्ज आणलं होतं. यापूर्वीही त्यांनी ड्रग्जची खरेदी-विक्री केली आहे का, तसंच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.
यावर्षी आतापर्यंत किती झाल्या कारवाया : 2024 साली मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं आतापर्यंत 24 गुन्हे दाखल करुन 62 आरोपींना अटक केलीय. या आरोपींकडून 34 किलो 500 ग्रॅम वजनाच्या विविध ड्रग्जचा साठा जप्त केलाय. त्यात 1200 कोडेनमिश्रीत कफ सिरप बॉटल्सचा समावेश आहे. या ड्रग्जची किंमत 31 कोटी 64 लाख रुपये इतकी आहे. चालू वर्षांत पोलिसांनी हेरॉईन तस्करीच्या तीन गुन्ह्यांची नोंद करुन आठ आरोपींना अटक केलीय. त्यांच्याकडून 1 किलो 138 ग्रॅम वजनाचं हेरॉईन जप्त केलं असून त्याची किंमत 4 कोटी 22 लाख रुपये आहे. तसंच एमडी ड्रग्ज तस्करीत सोळा गुन्हे दाखल करुन 46 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 22 कोटी 92 लाखांचा साडेअकरा किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केलाय.
हेही वाचा :
- विदेशातून आलेल्या प्रवाशानं 11 कोटींचं कोकेन लपविण्यासाठी लढवली अनोखी शक्क्ल; गुपित उघडताच डीआरआयनं घेतलं ताब्यात - Cocaine of 11 Crore Seized
- 252 कोटी किंमतीचे एमडी ड्रग्स जप्त करून कारखाना केला उध्वस्त - Raid On Drug Factory