ठाणे ACB Action In Bhiwandi: भिवंडी निजामपूरा शहर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या माजी नरसेवकासह त्याच्या कुटुंबियांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अपसंपदेची कोट्यवधींचा गैरव्यवहार प्रकरणी कारवाई केली आहे. तपासा अंती पाच जणांवर भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदारांमध्ये चर्चेचा विषय : सिध्देश्वर मोगलप्पा कामुर्ती (वय, ६४), पत्नी कावेरी कामुर्ती (वय,६२), श्रीकांत कामुर्ती (वय ३६), संकेत कामुर्ती (वय,३५), निशिकांत कामुर्ती (वय, ३२) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून श्रीकांत कामुर्ती हे कोकण पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवती आहे. विशेष म्हणजे उद्याच २६ जून रोजी या कोकण मतदार संघात मतदान होत असल्यानं मतदारांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.
एकत्रित उत्पन्न किती :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर कामुर्ती हे भिवंडी शहरातील तेलीपाडा परिसरात कुटूंबासह राहत असून त्यांच्या बेकायदा अपसंपदेच्या चौकशीची कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सुरू केली होती. या चौकशी दरम्यान या निरीक्षणामध्ये त्यांचे एकत्रित उत्पन्न ७ कोटी ४४ लाख २० हजार १६४ रूपये असून त्यांचा एकत्रित खर्च ४ कोटी ३७ लाख ८६ हजार ८५६ रूपये व एकत्रित मालमत्ता ५ कोटी २० लाख ६७ हजार ४२ रूपये असल्याचं तपासात निष्पन्न झाले होते.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : सिद्धेश्वर कामुर्ती यांची एकत्रित मालमत्ता आणि खर्च यांची बेरीज केली असता ती ९ कोटी ५८ लाख ५३ हजार ८९८ रूपये असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं कामुर्ती यांचं उत्पन्न ७ कोटी ४४ लाख २० हजार १६४ मधून एकत्रित मालमत्ता व खर्च ९ कोटी ५८ लाख ५३ हजार ८९८ रूपये वजा केले असता, त्यांनी १ जानेवारी १९८५ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत २ कोटी १४ लाख ३३ हजार ७३४ रूपये म्हणजेच २९ टक्के एवढी अपसंपदा गैरमार्गाने संपादित केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक स्वप्निल तुळशीदास जुईकर यांच्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर कामुर्ती यांच्यासह ५ जणांवर भ्रष्टाचार प्रति अधिनियमाच्या १९८८ अन्वये विविध कलमानुसार भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक विलास जाधव करत आहेत.