डॉ. ठकसेन गोराणे यांची प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वरCasteism in Trimbakeshwar :बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. त्र्यंबकेश्वर गावात जेवणाच्या पंगतीत जातिभेद केला जात असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं म्हटंल आहे. गावात विशिष्ट जातींसाठी वेगळी पंगत, तर इतर समाजातील लोकांसाठी वेगळी पंगत असते, असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी सांगितलं. या पद्धतीमुळं लोकांमध्ये भेदभाव वाढत असल्याचं देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं म्हटलं आहे. यातून सामाजिक विषमता वाढत आहे. त्यामुळं ही पद्धत बंद करण्याची मागणी डॉ. ठकसेन गोराणे यांनी केली आहे. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार तसंच पोलीस निरीक्षकांना निवदेन दिलं आहे.
'त्र्यंबकेश्वरातील महादेवी ट्रस्टकडून सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचं अंनिसचं म्हणणं आहे. त्यामुळं तहसीलदारांनी जातिभेदाला खतपाणी घालणारा प्रकार तत्काळ थांबविण्याची मागणी अंनिसनं केली आहे'. - डॉ. ठकसेन गोराणे, राज्य प्रधान सचिव, अंनिस
गावात दरवर्षी गावजेवणाचं आयोजन : त्र्यंबकेश्वर येथील महादेवी ट्रस्टतर्फे गावात दरवर्षी गाव जेवणाचं आयोजन केलं जातं. चैत्र, तसंच वैशाख महिन्यात ग्रामदेवतांच्या धार्मिक विधीनंतर या मेजवानीचं आयोजन करण्यातं येतं. त्यासाठी संपूर्ण गावातून देणगी, खाद्यपदार्थ जमा केले जातात. त्र्यंबकेश्वर गावातील सर्व सामाजिक स्तरातील लोक येथे जेवणासाठी येतात. मात्र, गावातील विशिष्ट जातीच्या कुटुंबीयांसाठी वेगळं जेवण शिजवलं जातं. त्यांच्या जेवणाची पंगतही वेगळी बसवली जाते, असा आरोप अंनिसनं केलाय.
प्रशासनानं लक्ष द्यावं :महादेवी ट्रस्टकडून जाती-पातीचा भेदभाव केला जात आहे. सोमवार २९ एप्रिल रोजी महादेवी ट्रस्टतर्फे गावोगावी भोजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी सर्व गावांतून लोक वर्गणी गोळा करत आहेत. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता गावातील जेवण सर्वांना दिलं जावं. एकाचवेळी सर्व ग्रामस्थांना एका रांगेत जेवायला बसवण्यासाठी प्रशासनानं लक्ष द्यावं, अशी मागणी अंनिसनं केलीय. तसंच महादेवीच्या नावाखाली होणारा जातिभेद तात्काळ बंद करावा, अशी मागणी अंनिसच्या वतीनं त्र्यंबकेश्वर तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे वाचलंत का :
- Sharad Pawar On Viral Caste Certificate : जगाला माझी जात माहिती आहे; मी कधी जातीवाद केला नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण
- Ashadhi Ekadashi 2023: वारकऱ्यांवर मशिदीतून पुष्पवृष्टी करत मुस्लिम बांधवांनी घेतला वारीमध्ये सहभाग, हिंदू मुस्लिम धर्मियांच्या एकतेचे दर्शन
- Jitendra Awhad : राज्यात जातीवाद पसरवणारा माणूस म्हणजे राज ठाकरे - जितेंद्र आव्हाड