महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमच्या नेत्यांवरील टीका राष्ट्रवादी खपवून घेणार नाही, आनंद परांजपे यांचा महायुतीतील 'या' नेत्याला इशारा - ANAND PARANJPE ON BHARAT GOGAWALE

पालकमंत्रिपदावरुन नाराजीचं गुऱ्हाळ काही केल्या संपत नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी गोगावले यांना आंदोलनावरुन इशारा दिला आहे.

file photo
ANAND PARANJPE (Anand Paranjpe)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2025, 4:40 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. सत्ता स्थापन करताना मुख्यमंत्रीपदावरून आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीत एकमत होत नव्हतं. यातच पालकमंत्री पदासाठी सुद्धा विलंब झाला. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजी असल्याचं दिसून आलं. त्यामुळे रायगड आणि नाशिक येथील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे.

महायुती सरकारनं जाहीर केलेल्या पालकमंत्री पदाच्या यादीत रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदिती तटकरे यांना देण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे भरत भोगावले इच्छुक होते. त्यांना पालकमंत्री पद न मिळाल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रस्त्यावर जाळपोळ करत आंदोलन केलं. पालकमंत्री पदावरून आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यावर केलेली टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भरत गोगावले यांचं नाव न घेता दिला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हे शोभनीय नाही :पुढे बोलताना आनंद परांजपे म्हणाले की, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीत पालकमंत्री पदाचं योग्यरित्या आणि सर्वांशी चर्चा करून वाटप केलं आहे असं सांगितलं होतं. परंतु, महायुतीत पालकमंत्री पदावरून नाराजी समोर आली आहे. दरम्यान, नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पद रद्द केल्यानंतर तिथल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तसंच त्यांच्याकडून आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यावर वैयक्तिकरित्या टीका केली जात आहे. महायुतीतील पालकमंत्री पद सर्वांच्या चर्चेनं झालं होतं. मग आता विरोध का? असा सवाल यावेळी आनंद परांजपे यांनी उपस्थित केला. एक संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीनं खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका ही लोकप्रतिनिधी आणि मंत्र्याला शोभत नाही, अशीही टीका आनंद परांजपे यांनी भरत गोगावले यांच्यावर केली. इथून पुढे आमच्या नेत्यांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली तर, आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला.

...तर त्यांनी त्यांच्या नेत्यांशी चर्चा करावी :राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात करार केले जाणार आहेत. तसंच परदेशी गुंतवणूक देशात मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती आणि उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर असताना पालकमंत्री पदासाठी जाळपोळ करणं, आंदोलन करणं आणि टीका करणं हे चुकीचं असून, विरोधकांच्या हातात आयते कोलीत देण्यासारखं आहे. तसंच मुख्यमंत्री फडणवीस परदेश दौऱ्यावर असताना कोणीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. ते पालकमंत्री पदावरून नाराज होते तर, त्यांचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा करावी. पण मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर असताना इथे केवळ पालकमंत्री पदावरून टीका करणे, आंदोलन करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे महायुतीत समन्वय नाही हे दिसून येतं. हा एक विरोधकांना मुद्दा मिळतो. येथून पुढे जर आमच्या नेत्यांवर टीका केली तर महायुतीतील घटक पक्ष म्हणून आम्हीही शांत बसणार नाही. ती टीका खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी आनंद परांजपे यांनी भारत गोगावले यांचं नाव न घेता दिला.

हेही वाचा :

  1. "ठाण्याचा विकास मोदींमुळं रखडला", 'ईटीव्ही भारत'च्या निवडणूक चर्चासत्रात विरोधकांचा आरोप
  2. रायगडसह नाशिकच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती, महायुतीमधील नाराजीनंतर सरकारवर नामुष्की
  3. प्रजासत्ताक दिनी कोण कुठं करणार ध्वजवंदन, मुख्यमंत्री कुठे करणार ध्वजवंदन?

ABOUT THE AUTHOR

...view details