मुंबई Amruta Fadnavis Extortion Case :मागच्या वर्षी बुकी अनिल जयसिंगानी यानं अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्याची तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांकडं दाखल केली होती. त्या संदर्भातला खटला आधी सत्र न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात दाखल झाला होता. जामीन मिळण्यासाठी अनिल जयसिंगानीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या न्यायालयात दाखल होता. संदर्भातील खटल्याच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या न्यायालयानं बुकी अनिल जयसंघानीला आज जामीन मंजूर केला आहे. 31 जानेवारी रोजी न्यायालयानं हे आदेश पत्र जारी केलेलं आहे.
ओळख करून खंडणी मागण्याचा प्रयत्न : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी बुकी अनिल जयसिंगानी याच्या मुलीनं ओळख केली होती. त्यानंतर मुलीला मैत्री करायला लावून वडिलानं मुलीमार्फत अमृता फडणवीस यांना जाळ्यात अडकवण्यासाठी सापळा रचल्याचा दावा करण्यात आला होता. त्याद्वारे खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली होती. एफ आय आर नोंदवल्यानंतर बाप आणि लेकीला अटक करण्यात आली होती. यावेळी अनिल जयसिंगानीच्या मुलीला काही अटीवर जामीन दिला होता. मात्र अनिल जयसिंगानी याच्यावर अनेक खटले असल्यामुळं तो कोठडीतच होता. मात्र त्यानं जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकल खंडपीठानं त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. त्यामुळं आता त्याचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.