अमरावती-मेळघाटच्या पायथ्याशी बागलिंगा या गावात असणाऱ्या सातपुडा पर्वतावर जवळपास दीड हजार फूट उंच घनदाट जंगलातून चढाई करत चिमुकले, तरुण आणि काही वयस्क अशा 280 जणांनी शनिवारी गाविलगड किल्ला सर केला. चांदूरबाजार येथील स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं मेळघाटातील ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याच्या दोन दिवसीय महोत्सवाला प्रारंभ झाला. या महोत्सवात जवळपास दहा किलोमीटरचा खडतर प्रवास करून इतिहासातील गाविलाड चढाई, इतिहास आणि महोत्सवाबाबत "ईटव्ही भारत" चा हा स्पेशल रिपोर्ट.
आठ वर्षांपासून गडाची चढाई-बाराव्या शतकात मेळघाटातील गवळी राजानं आजच्या चिखलदरा येथे भव्य किल्ला बांधून आपलं राज्य निर्माण केलं. गवळी राजाचा किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख 'गवळीगड' अशी होती. गवळीगडचा अपभ्रंश होऊन आज हा किल्ला 'गाविलगड' नावानं ओळखला जातो. सुरुवातीला फतेल्ला इमादशहानं या किल्ल्यावर आक्रमण केलं. 85 वर्षानंतर मुघलांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर मराठ्यांनी या किल्ल्यावर 1803 पर्यंत राज्य केलं. संपूर्ण देशात सत्ता स्थापन करणाऱ्या इंग्रजांनी किल्ल्यावर आपला झेंडा फडकवला . इमादशही, मुघलशाही पुढे मराठे आणि इंग्रजांनी या किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी एका मार्गाचा वापर केला होता. त्याच मार्गावरून गत आठ वर्षांपासून स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख शिवा काळे यांच्या नेतृत्वात गड चढण्याची मोहीम 14 डिसेंबरला राबविली जाते.
गडावर मोठे युद्ध आणि राणीसह महिलांचा जोहर-मुघलांचा पराभव करून नागपूरचे रघुजीराजे भोसले यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून बेनीसिंह राजपूत याची नेमणूक करण्यात आली. या किल्ल्याचा राजा अशीच बेनीसिंहाची ओळख होती. 19 नोव्हेंबर 1803 ला मराठ्यांविरुद्ध शिरसोली अडगाव येथील युद्ध जिंकल्यावर इंग्रजांनी 13, 14 आणि 15 डिसेंबरला गाविलगडवर हल्ला चढवला. तीन दिवस बेनीसिंहाच्या नेतृत्वात गाविलगडावरील सैन्यानं इंग्रज सैन्याशी युद्ध केलं. या दरम्यान नागपूरवरून गाविलगडावर कुठलीही मदत पोहोचू शकली नाही. इंग्रजांशी लढताना शेकडो सैन्यासह बेनीसिंह राजपूत मारला गेला. इंग्रज सैन्याच्या हाती लागायचं नाही म्हणून बेनीसिंहाची राणी रूपवतीच्यासह गडावरील महिलांनी खोलदरीत उड्या मारून 'जोहर' केला, अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक विवेक चांदुरे यांनी या मोहिमे दरम्यान 'ईटीव्ही भारत'ला दिली.
गाविलगडच्या अनुभवातूनच नेपोलियन बोनापार्टचा पराभव-गाविलगडवर हल्ला करणाऱ्या इंग्रज सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या ऑर्थर व्हेलेन्सली याच्यावर इंग्रज सरकार नेपोलियन बोनापार्टचा फ्रान्समध्ये जाऊन पाडाव करण्याची जबाबदारी टाकली होती. भारतातदेखील ऑर्थर व्हेलेन्सली याचं जाणं येणं होतं. विशेष म्हणजे गाविलगड किल्ल्यावर इंग्रज सैन्याचं नेतृत्व ऑर्थर व्हॅलेन्सली यानंच केलं. पुढे 18 जून 1815 ला वॉटरलूच्या लढाईत इंग्रजांनी नेपोलियन बोनापार्टचा पराभव हा ऑर्थर व्हेलन्सली याच्या नेतृत्वातच केला. गाविलगडवर विजय मिळवण्यासाठी काही फंदफितुरी आणि इतर अनुभव ऑर्थरला मिळाले होते. त्याच अनुभवाचा फायदा नेपोलियन बोनापार्टचा पराभव करण्यासाठी झाल्याचं स्वतः ऑर्थर व्हॅलेंसली यानं लिहून ठेवलं असल्याची माहिती इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक संतोष झांबरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.