महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी फुलली मेळघाटात! शेतकऱ्यांच्या दारी आली समृद्धी - AMRAVATI STRAWBERRY FARMING

'स्ट्रॉबेरी' म्हटलं की, सर्वांना महाबळेश्वरची आठवण येते. मात्र, अमरावतीमधील शेतकऱ्यांनी (Strawberry in Amravati) चक्क आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे.

Amravati Strawberry Farming, farmers from Motha and Aladoh in Melghat successfully cultivated strawberries
मेळघाटात फुलली स्ट्रॉबेरीची शेती (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2025, 10:40 AM IST

Updated : Feb 23, 2025, 11:42 AM IST

अमरावती : स्ट्रॉबेरी म्हटलं की डोळ्यासमोर महाबळेश्वरचं पहिलं चित्र येते. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का की, गेल्या दहा वर्षांमध्ये महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता सातपुडा पर्वतानं वेढलेल्या मेळघाटात देखील रुजलीय. सुरुवातीला थोडं कठीण वाटत असणारं स्ट्रॉबेरीचं उत्पन्न मेळघाटातील शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा देणारं ठरतंय. आधी मोथा गावात एक दोन शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेण्यास पुढाकार दाखवला. सध्या, चार ते पाच गावातील दहा ते पंधरा शेतकरी स्ट्रॉबेरीच्या उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळवत आहेत.

माती परीक्षण करून स्ट्रॉबेरीची लागवड : अमरावती येथील श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाच्या वतीनं मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात 2014-15 मध्ये माती परीक्षण केल्यावर या मातीत स्ट्रॉबेरीचं उत्पादन होऊ शकतं हे स्पष्ट झालं. चिलखदरा तालुक्यात पाच ते सहा गावांमध्ये 50 शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रोत्साहित करणारा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला. पहिल्याच वर्षी सर्वच शेतकऱ्यांना किमान दोन लाखांपर्यंत उत्पन्न झालं. यानंतर शेतकऱ्यांना स्वखर्चानं स्ट्रॉबेरी लागवड करायची होती. सुमारे 25 शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. मात्र, मोथा या गावात आमच्याच शेतात स्ट्रॉबेरीचं सर्वाधिक उत्पन्न झालं, अशी माहिती मोथा येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी गजानन शनवारे यांनी दिलीय.

मेळघाटात फुलली स्ट्रॉबेरीची शेती (ETV Bharat Reporter)

शेतकऱ्यांमध्ये पुन्हा संचारला उत्साह : "स्ट्रॉबेरीची लागवड करूनदेखील चांगलं उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी पुढील दोन-तीन वर्षे स्ट्रॉबेरीचा नाद सोडला होता. परंतु, आमच्या शेतात येणारी स्ट्रॉबेरी आणि त्यातून लागवडीच्या तुलनेत दुप्पट मिळणारं उत्पन्न पाहता पुन्हा एकदा काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीबाबत उत्साह दाखवला. यामुळं मोथा गावासह लगतच्या आलाडोह, मडकी या गावात देखील स्ट्रॉबेरीचं उत्पन्न आता व्हायला लागलंय,"असं गजानन शनवारे म्हणाले.

स्ट्रॉबेरीसाठी शेतकरी आले एकत्र :पुढं त्यांनी सांगितलं की, "नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यात स्ट्रॉबेरीची लागवड करून उत्पादन होतं. स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी स्ट्रॉबेरीची रोपं ही महाबळेश्वर येथून आणावी लागतात. गेल्या तीन-चार वर्षांपासून मोथा, आलाडोह, मडकी, चिखलदरा यासह मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या तीन-चार गावांमधील शेतकरी एकत्रित येऊन महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपं मागवतात. एकत्रितपणे स्ट्रॉबेरीची रोपं मागवल्यामुळं वाहतुकीचा खर्च थोडा कमी येतो."

पर्यटकांमुळं बाजारपेठेची चिंता नाही : "स्ट्रॉबेरीचं उत्पन्न आमच्याच परिसरात होत असल्यानं मोठी बाजारपेठ शोधण्याची समस्या आजपर्यंत आली नाही. चिखलदरा येथे येणारे पर्यटक मोठ्या आवडीनं स्ट्रॉबेरी खरेदी करतात. चिखलदराकडं येताना मडकी, मोथा, आलाडोह या तिन्ही गावांमध्ये स्ट्रॉबेरीची विक्री करणारे स्टॉल लागलेले दिसतात. चिखलदरा येथे हरिकेन पॉईंट, गाविलगड किल्ला, स्कायवाक पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. यामुळं मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी विक्री होते. यासोबतच अमरावती शहरात देखील मेळघाटातील स्ट्रॉबेरी आता मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आम्ही पाठवतो," असं देखील गजानन शनवारे यांनी सांगितलं.

खव्यासोबत स्ट्रॉबेरीची विक्री : आलाडोह, मोथा आणि मडकी या तिन्ही गावात दुधाचा अतिशय दर्जेदार खवा मिळतो. खवा तयार करणं आणि त्याची विक्री करण्याची जबाबदारी ही प्रामुख्यानं महिलांचीच असते. आता शेतात स्ट्रॉबेरीचं देखील चांगलं उत्पादन होत असल्यामुळं चिखलदरा ते परतवाडा मार्ग लगतच शेतांमध्ये खव्यासोबतच स्ट्रॉबेरी विक्रीचा व्यवसाय अनेक महिला करतात. "खव्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नासोबतच आता स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून रोज चांगले पैसे आम्हाला मिळतात," असं आलाडोह येथील रहिवासी गोपी नारायण खडके म्हणाल्या. तसंच दरवर्षी आम्ही थोड्याफार प्रमाणात स्ट्रॉबेरी लावतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या मध्यापर्यंत स्ट्रॉबेरीची चांगल्या प्रकारे विक्री होते. दीडशे ते दोनशे रुपये किलो या भावानं आम्ही स्ट्रॉबेरीची विक्री करतो. खव्यासोबतच आता स्ट्रॉबेरीमुळं आमच्या हाती पैसा राहतो, याचा आनंद गोपी खडके यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. नांदेडच्या तरुणानं फुलवली स्ट्रॉबेरी शेती; वर्षाला लाखोंचं उत्पन्न
  2. प्राथमिक शाळेच्या परसबागेत लाल चंदन, मसाले, फळं, भाज्या; चिमुकल्यांची मज्जा
  3. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी झळकली टपाल तिकिटावर, मुंबईत झालं विशेष टपाल कॅन्सलेशनचं अनावरण
Last Updated : Feb 23, 2025, 11:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details